मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील चोरीप्रकरणी ४६ जणांविरोधात कारवाई केली असून नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सर्व आरोपींना तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच, प्रकरणातील सर्व आरोपी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असून त्यातील एकाला नगरसेविका विशाखा राऊत यांनी कामावर ठेवले होते, असा आरोप सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला. दरम्यान, चोरीच्या प्रकरणाबाबत अद्यापही काही जणांवर संशय असून याप्रकरणी आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाल्याच्या कथित आरोपानंतर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, सदा सरवणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. सिध्दीविनायक न्यासमध्ये काही तरी गडबड सुरू असल्याचा अंदाज आल्यानंतर तातडीने हालचाली सुरू केल्या. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी पत्र पाठवून न्यासामध्ये काहीतरी गैरप्रकार सुरू असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. तसेच न्याय आणि विधि विभागालाही पत्र पाठविण्यात आले होते.
दरम्यान, एका कर्मचाऱ्याने चोरी केल्याचे समजल्यानंतर संशय आणखी बळावला. या प्रकरणात केवळ एक – दोन जण सहभागी नसून मोठे रॅकेट असल्याचा संशय वाढला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला, असे सरवणकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने सर्व चोरांना पकडण्यात यश आले. तसेच त्यापूर्वी दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेण्याचाही प्रकार सुरू होता. मात्र, हे लक्षात आल्यानंतर ४६ जणांविरोधात कारवाई केली होती. संबंधितांवर कारवाई केल्यानंतर मंदिराच्या उत्पन्नात आणखी वाढ झाली. अचानक आवक वाढल्यानंतर लेखापरीक्षण करण्याचा विचार आला, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी केली जावी, अशीही मागणी मंदिराच्या विश्वस्तांनी केली.
भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी न्यासाने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांना वेगळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. तसेच, मंदिरात येताना आणि घरी जाताना त्यांच्याकडील पैशांची तपासणी होईल, असे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी सांगितले. मागील दहा वर्षांत कधीही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे किंवा कारवाई करण्याचे प्रकार घडले नव्हते. मात्र, आम्ही श्रद्धेने व प्रामाणिकपणे काम करत असल्याने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले, असेही त्यांनी नमूद केले.
