मुंबई: सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा मोरे-पाटील यांच्यावर झालेल्या आरोपानंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यावर आता मंत्रालयीन विभागांतील कार्यकारी सचिव नेमण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक अधिकाऱ्यांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत.

सिद्धिविनायम मंदिराचा नवीन विकासआराखड्यानुसार कायापालट होणार आहे. याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे पाचशे काेटींचा खर्च यासाठी अपेक्षित असून मंदिराचा कायापालट होत असतानाच सरकारने यावर कार्यकारी अधिकारीही बदलण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच विद्यमान कार्यकारी अधिकारी वीणा पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांच्यावर अनियमिततेचे व गैरकारभाराचे आरोप झाले होते.

या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीसही बजावली आहे. त्यांच्याविरोधात तीन तक्रारदारांनी विधी व न्याय विभागात तक्रार केली होती. यामध्ये प्रशासकीय कामात पारदर्शकता नसणे, अधिकारांचा गैरवापर करणे आणि आर्थिक व्यवहारांतील अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता.

यासंदर्भात या दोन्ही अधिकाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाकडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे याआधीच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांच्यावरही असेच आरोप करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने नवीन कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला. याविषयीचा शासन निर्णय आणि जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली असून प्रतिनियुक्तीवर मंत्रालयीन विभागातील अवर सचिव दर्जाचा अधिकारी नेमण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला देण्यात आले आहेत. मंदिराचा कायापालट होताना हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

उज्जैनच्या धर्तीवर मंदिराचा कायापालट

या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी मार्ग विकसित करणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, भाविकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था, भूमिगत पार्किंग तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय मंदिर परिसराला आधुनिक स्वरूप देतानाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५०० कोटी रुपयांदरम्यान सांगितला जात आहे. उज्जैन कॉरिडोरच्या धर्तीवर हे कॉरिडोर तयार केले जाणार आहेत. भव्य प्रवेशद्वार, पारंपरिक वास्तुकलेची झलक आणि आधुनिक सुविधांचा यात समावेश आहे.