scorecardresearch

आदेश बांदेकर अध्यक्ष असलेल्या सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये साजूक तुपाचा घोटाळा? ‘महिन्याभरात चौकशी पूर्ण करणार’, फडणवीसांची घोषणा!

१५ ते १६ हजार लीटर साजूक तूप करोना काळात विकलं? आमदार सदा सरवणकरांचा गंभीर आरोप!

आदेश बांदेकर अध्यक्ष असलेल्या सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये साजूक तुपाचा घोटाळा? ‘महिन्याभरात चौकशी पूर्ण करणार’, फडणवीसांची घोषणा!
सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये साजूक तूप घोटाळा? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर अध्यक्ष असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला. माहीमचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरात या आरोपांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. तसेच, जर गैरकारभार झाला असेल, तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असंही फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

२०१८मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. सहा महिन्यांपूर्वी अवघ्या अडीच वर्षांत शिंदेंच्या बंडखोरीनंतर मविआचं सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकरांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले सदा सरवणकर?

आमदार सदा सरवणकर यांनी विधानसभेत बोलताना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “न्यासाच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री निधीतून पाच कोटींचा चेक देणं हे गैरव्यवहाराचं लक्षण आहे. २५ हजारांपेक्षा जास्त रक्कम देताना शासनाची परवानगी घ्यावी लागते. मग हा चेक देताना अशी परवानगी न्यासानं घेतली होती का?” असा प्रश्न सरवणकरांनी उपस्थित केला.

“मार्च २०२०मध्ये ट्रस्टने उत्तर प्रदेशमधील एका कंपनीकडून १५ ते १६ हजार लीटर साजूक तुपाची खरेदी केली. करोना काळात लॉकडाऊनदरम्यान मंदिराच्या ट्रस्टींनी हे तूप विकून टाकलं”, असा आरोप सरवणकरांनी केला आहे. शिवाय, “लॉकडाऊननंतर २०२१मध्ये मंदिर पुन्हा खुलं होताच ट्रस्टनं भक्तांना दर्शनासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली. या कामासाठी ४०-५० लाखांचा खर्च येत असताना ३.५ कोटींचं कंत्राट ट्रस्टींशी संबधित व्यक्तीला देण्यात आलं. तसेच, मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीच्या कामातही बराच गैरव्यवहार झाला आहे”, असा आरोपही सरवणकरांनी केला.

संपविण्याच्या प्रयत्नामुळे बंड ! मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

महिन्याभरात चौकशी पूर्ण करणार

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी या आरोपांची महिन्याभरात चौकशी पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहात दिलं. “सदा सरवणकरांनी न्यासाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न मांडले आहेत. याबाबतची एक तक्रारही राज्य सरकारकडे आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भातली सगळी चौकशी एक महिन्याच्या आत पूर्ण करू. हा न्यास शासनाच्या अंतर्गत आहे. चौकशीनंतर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल”, असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 09:34 IST

संबंधित बातम्या