scorecardresearch

दक्षिण, मध्य मुंबईतील आलिशान घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ; करोना काळात विक्रीला चाप

करोना संसर्गामुळे अडचणीत आलेला बांधकाम उद्योग आता चांगलाच सावरला आहे.

निशांत सरवणकर

मुंबई : करोना संसर्गामुळे अडचणीत आलेला बांधकाम उद्योग आता चांगलाच सावरला आहे. मावळत्या वर्षांत घरविक्री समाधानकारक झाल्याने खुशीत असलेल्या या उद्योगाला शहरातील तयार आलिशान घरांसाठीही ग्राहक मिळू लागला आहे. गेल्या वर्षांत ही विक्री ५० टक्क्यांनी वाढली असून त्यामुळे रोकडसुलभता वाढत असल्याचे हा उद्योग खुशीत आहे. यामुळे २०१८ मधील विक्रीतून मिळालेल्या ४७ हजार ८०० कोटींवरून ७३ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे.

करोना काळात ठप्प झालेला हा उद्योग पहिल्या लाटेनंतर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे विक्रमी घरविक्रीमुळे बऱ्यापैकी सावरला. एक कोटी वा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांचीच विक्री अधिक होत होती. शहरातील विशेषत: आलिशान घरांना (दोन ते पाच कोटी हा त्यापेक्षा अधिक) पाहिजे तसा ग्राहक मिळत नव्हता. करोनामुळे आर्थिक गणिते बिघडल्याने घरखरेदीदारही सावध झाला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर गाठला आणि पुन्हा हा उद्योग ठप्प होतो का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु याच काळात मुंबई महानगर परिसरात दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढली.

२०१८ मध्ये या घरांची जी विक्री झाली तसा प्रतिसाद २०१९ व २०२० या वर्षांत मिळाला नाही. मात्र मावळत्या वर्षांत २०१८ च्या तुलनेत ही विक्री ५० टक्क्यांपर्यंत क वाढली. २०१८ मध्ये दक्षिण व मध्य मुंबईत अनुक्रमे झालेल्या तीन हजार ५९ घरांची व चार हजार २३७ इतक्या घरविक्रीच्या तुलनेत ती चार हजार ६८६ (५३ टक्के अधिक) व सात हजार ३३७ (७३ टक्के अधिक) इतकी नोंदली गेली. त्याचवेळी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील घरविक्रीत फक्त १२ टक्के वाढ झाली. २०१८ मध्ये झालेल्या दोन लाख सात हजार ७४३ घरविक्रीच्या तुलनेत २०२१ मध्ये दोन लाख ४२ हजार ६१ इतकी घरविक्री झाली. संपूर्ण महानगर परिसरात झालेल्या ३४ हजार ३१८ घरविक्रीपैकी दक्षिण व मध्य मुंबईतील घरविक्री १२ हजार २३ इतकी नोंदली गेली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Significant increase luxury home sales south central mumbai sales pressure corona period ysh

ताज्या बातम्या