मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाच्या सोडतीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. कोकण मंडळाने सोडतीची तयारी, घरांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र, सोडतीतील घरांची वाढलेली संख्या आणि राज्य सरकारने उत्पन्न मर्यादेत केलेले बदल यांमुळे ही सोडत प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये २० टक्के योजनेतील ८१२ घरांसाठी दोन लाख सात हजार अर्ज दाखल झाले होते. या घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने मंडळाने २० टक्क्यांतील घरे मिळविण्यावर भर दिला. मंडळाला या योजनेतून जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान एक हजाराहून अधिक घरे मिळाली. त्यामुळे मार्चमध्ये १२०० घरांसाठी सोडत काढण्याची घोषणा मंडळाने केली. मात्र विकासकांकडून सादर करण्यात आलेल्या २० टक्क्यांच्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने संबंधित विकासकांना पुन्हा सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश मंडळाने दिले. त्यामुळे सोडत रखडली असून अजूनही सोडतीबाबत अनिश्चितता कायम आहे.
सरकारने नुकतीच सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. तसेच सरकारकडून नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार सोडतीतील घरांच्या किमतीस, तसेच २० टक्क्यांच्या योजनेतील घरांचे प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. त्यानुसार सोडतीसाठीची सर्व प्रशासकीय मान्यता मंडळ, म्हाडा प्राधिकरणाला शासनाकडून घ्यावी लागणार आहे. यामुळेही सोडतीस विलंब लागण्याची शक्यता आहे.
घरांच्या संख्येत आणखी वाढ?
म्हाडाकडे २० टक्के योजनेअंतर्गत आतापर्यंत २३ प्रस्ताव सादर झाले असून यात एक हजार ६८७ घरांचा समावेश आहे. तसेच विरारमधील ३४८ घरांचा सोडतीत समावेश असणार आहे. त्यामुळे सोडतीतील घरांची संख्या दोन हजारांहून अधिक असणार आहे. गोठेघर येथे बांधकाम सुरू असलेल्या ४०० हून अधिक घरांचा सोडतीत समावेश होण्याची शक्यता आहे.