मुंबई : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्ष कोण असेल याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे, आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नसल्याने त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाईल याबाबतही उत्सुकता आहे.

भाजपने विधान परिषदेतील कोणालाच पहिल्या टप्प्यातील विस्तारात संधी दिलेली नाही. त्यातून प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे आदींचा समावेश मंत्रिमंडळात होऊ शकला नाही. या नेत्यांवर कोणती जबाबदारी सोपविणार याचाही प्रश्न आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील प्रवीण दरेकर, संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांनाही काही जबाबदाऱ्या मिळतील, अशी शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्याने त्यांच्या जागी अन्य नेत्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्याचे उद्दिष्ट भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरविले आहे. त्यामुळे शेलार किंवा दरेकर यांच्यासह काही नेत्यांचा विचार मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी होऊ शकतो. शेलार यांच्याकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महापालिका निवडणूक संचालन समितीची जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार यांच्याबरोबरच राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे या ओबीसी नेत्यांबाबतही विचार सुरू आहे. विधान परिषद सभापतीपदासाठी भाजपचे राम शिंदे, दरेकर, बावनकुळे , भाई गिरकर आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. शेलार यांना मुंबई अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्षपद न दिल्यास पुढील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत स्वागत

डोंबिवली: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे मंगळवारी रात्री डोंबिवलीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विकास कामे आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी  प्रयत्नशील राहू, असे चव्हाण यांनी सांगितले.  घरडा सर्कल येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तेथून ते मिरवणुकीने गणेश मंदिराकडे आले.  मंदिर संस्थानतर्फे चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. फडके रस्त्यावर जमलेल्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ढोल ताशा, वाजंत्री यांच्या गजरात नृत्य करत चव्हाण यांचे स्वागत केले.  या आनंदोत्सवात डोंबिवलीतील नागरिक, व्यापारी, उद्योजक सहभागी झाले होते.