शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपचा गोंधळ

मुंबई : गॅस सिलिंडर स्फोटातील बालक मृत्यू प्रकरणावरून मुंबईकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच आगीत तेल पडू नये म्हणून काही विशिष्ट कामांमधील वाढीव खर्च आणि कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याचे सुमारे ७५५ कोटी ९५ लाख रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत राखून ठेवत शिवसेनेने गप्प राहणे पसंत केले. मात्र, भाजपने गोंधळ घालून शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला.

दहिसर जम्बो करोना केंद्रांतील विविध कामांचे दोन, अंधेरी तेली गल्लीग्रेड सेपरेटर फेरफार, हिंदमाताला पावसाळ्यात जलमुक्ती देण्यासाठी, शाळांची साफसफाई, पवई तवालाची देखभाल आणि सागरी किनारा मार्गाच्या सल्ला शुल्कातील वाढ असे एकूण ८४० कोटी ३ लाख रुपयांचे प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले होते.

 दहिसर जम्बो करोना केंद्रासाठी विविध वस्तू खरेदीसाठी ८ कोटी १० लाख रुपये, तर तंबू उभारणीसाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. गोरेगावमधील पुलाच्या कामात २५ कोटी रुपयांची फेरफार करण्याचा, हिंदमाता परिसराला पावसाळ्यात जलमुक्ती देण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचे निविदा न मागविताच चार टप्प्यात कंत्राटदारांना केलेले वाटप, करोनाकाळात बंद असलेल्या शाळांच्या सफाईच्या कंत्राटाला सहाव्यांदा देण्यात येत असलेली मुदतवाढ आदी प्रस्तावांवरून सत्ताधारी शिवसेना प्रशासनाला घेरण्याची तयारी भाजपने केली होती.

 स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दहिसर करोना जम्बो केंद्र (२० कोटी ५ लाख) आणि केवळ सागरी किनारा मार्गाच्या (६४ कोटी ९१ लाख रुपये) प्रस्तावांना मंजुरी दिली. उर्वरित ७५५ कोटी ९५ लाख रुपयांचे प्रस्ताव त्यांनी राखून ठेवले.

नगरसेवक संतप्त

प्रस्तावांवर चर्चा करण्याची संधी द्यावी आणि मग त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजप नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र प्रस्ताव पुकारून ते राखून ठेवण्यात येत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप नगरसेवकांचा भडका उडाला. नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर यशवंत जाधव यांनी बैठक आटोपती घेतली.