मुंबई : वय वाढत असताना विसरण्याची समस्या ही नैसर्गिक मानली जाते. मात्र, अलीकडील एका महत्त्वपूर्ण अभ्यासाने या समजुतीला छेद दिला आहे. ‘लपलेला ताण’ हा स्मरणशक्ती कमी होण्यामागचा मोठा आणि धोकादायक घटक ठरत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बाहेरून न दिसणारा पण मनात साचत राहणारा हा ताण हळूहळू मेंदूवर परिणाम करत स्मरणशक्तीला कमजोर करतो.
तज्ज्ञांच्या मते हा ‘सायलेंट स्ट्रेस’ अत्यंत कपटी आहे. अनेक वेळा व्यक्तीला स्वतःलाही आपण तणावाखाली आहोत हे जाणवत नाही. मात्र, शरीर आणि मेंदूवर त्याचे परिणाम सातत्याने होत राहतात. वय वाढत गेले की मेंदूची ताण सहन करण्याची क्षमता कमी होत जाते, त्यामुळे हा लपलेला ताण अधिक घातक ठरतो. संशोधनानुसार, दीर्घकाळ ताणाखाली राहिल्यास शरीरात कॉर्टिसोलसारख्या ताण-हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते. हे हॉर्मोन्स मेंदूच्या त्या भागावर परिणाम करतात, जो स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित असतो.
परिणामी, स्मरणशक्ती कमी होणे, गोष्टी पटकन विसरणे, लक्ष केंद्रीत न होणे अशा समस्या निर्माण होतात. दीर्घकाळात मेंदूचा आकारही कमी होऊ शकतो, असेही काही अभ्यास सूचित करतात.
या अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. लपलेला ताण हा अनेकदा एकटेपणा, सामाजिक दुरावा, भावनिक अस्थिरता किंवा मानसिक दडपण याच्या रूपात दिसून येतो. विशेषतः वृद्धांमध्ये एकटेपणा हा मोठा धोका बनत चालला आहे. सामाजिक संपर्क कमी झाल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर दिसतो. डॉक्टरांच्या मते, ताणाचा प्रभाव सुरुवातीला फारसा जाणवत नाही. मात्र, हळूहळू त्याची लक्षणे दिसू लागतात. छोटी-छोटी कामे विसरणे, लक्ष न लागणे, निर्णय घेण्यात अडचणी येणे, सतत थकवा जाणवणे ही सर्व लक्षणे पुढे गंभीर आजारांची पूर्वसूचना ठरू शकतात. यामध्ये डिमेंशिया सारख्या विकारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही संशोधनांत असेही दिसून आले आहे की ज्या व्यक्तींमध्ये ताणाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यात स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका अधिक असतो. चिंता आणि मानसिक तणाव हे मेंदूच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतात. त्यामुळे वयानुसार फक्त शारीरिक आरोग्य नव्हे, तर मानसिक आरोग्य जपणेही तितकेच आवश्यक आहे.तज्ज्ञांनी काही सोप्या उपायांवर भर दिला आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, ध्यान-धारणा आणि कुटुंबीय व मित्रांसोबत संवाद ठेवणे या गोष्टी ताण कमी करण्यास आणि मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेषतः वृद्धांनी सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘लपलेला ताण’ ओळखणे आणि त्यावर वेळेत उपाय करणे. जर वारंवार विसरण्याच्या समस्या, मानसिक थकवा किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.हा अभ्यास एक इशारा देतो तो म्हणजे ताण नेहमी दिसून येत नाही, पण त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे वाढत्या वयात मानसिक आरोग्याची काळजी घेणे हीच खरी गुंतवणूक आहे. अन्यथा, हा ‘सायलेंट किलर’ नकळत स्मरणशक्ती हिरावून घेऊ शकतो.
