साध्या, निमआराम शिवशाहीच्या तिकीट दरात पाच ते पंधरा रुपयांची वाढ

मुंबई : एसटी महामंडळाने तिकीट दरात के लेल्या वाढीमुळे मुंबई महानगरातील प्रवासही महागला आहे. मुंबई ते ठाणे, पनवेल, बोरिवलीसाठीच्या साध्या, निमआराम व शिवशाही बस प्रवासासाठी पाच ते पंधरा रुपये जादा मोजावे लागत आहेत. महानगरातील काही भागातून मुंबई शहरासाठी काही बेस्ट बसही धावतात. बेस्टपेक्षाही एसटीचा प्रवास बराच खर्चीक होत आहे.

एसटी महामंडळाने १७.१७ टक्के  भाडेवाढ के ली. यामुळे राज्यातील लांब पल्ल्याच्या मार्गावरचा प्रवास बराच महागला आहे. किमान पाच रुपयांपासून ते १८५ रुपयांपेक्षाही तिकीट दरात वाढ झाली आहे. मुंबई महानगरातही या दरवाढीचा फटका बसला आहे. निर्बंध शिथिल के ल्याने गेल्या काही दिवसांत अत्यावश्यक सेवांबरोबरच खासगी कार्यालयीन कर्मचारी व कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बेस्ट, लोकलबरोबरच काही प्रमाणात नागरिक एसटीतून प्रवास करणे पसंत करीत आहेत.

परंतु तिकीट दरात वाढ झाल्याने एसटी प्रवाशांना फटका बसला आहे. मंत्रालय ते ठाणे असा साध्या बससाठी आधी ५५ रुपये तिकीट होते. आता हाच दर ६० रुपये झाला आहे. पनवेलहूनही मंत्रालयासाठी साध्या बसने एसटी प्रवास करणाऱ्यांना दहा रुपये जादा मोजावे लागत आहेत. सध्या ७० रुपये तिकीट दर आहे. मुंबई ते वसईसाठीही साध्या बसचे प्रवासी तिकीट १०५ रुपयांवरून थेट १२० रुपये झाले. वातानुकू लित शिवशाही बसचाही प्रवासही महागला असून ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या प्रवासासाठी ८० रुपयांऐवजी ९० रुपये मोजावे लागणार आहेत. तर याच मार्गावरील साध्या बसचे ४० रुपये तिकीट पाच रुपयांनी वाढले आहे.

बेस्ट प्रवास स्वस्त

ठाणे, नवी मुंबईतील काही भागात बेस्टकडून बससेवा उपलब्ध करण्यात येते. बेस्ट बसचे साध्याचे भाडे हे चार टप्प्यांत आहे. यात पाच किलोमीटरसाठी किमान भाडे पाच रुपये, तर त्यापुढे १०, १५ आणि २० रुपये भाडे आकारण्यात येते. तर वातानुकू लित बसचे पाच किलोमीटरसाठी किमान भाडे सहा रुपये असून त्यानंतर टप्प्यांसाठी १३, १९ आणि २५ रुपये भाडे आकारण्यात येते.  हे दर लक्षात घेता बेस्टचा प्रवास स्वस्त ठरत आहे.