मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराच्या देखभालीसाठीच्या मानधनात तब्बल ५० वर्षांनी वाढ करण्यात आली आहे.छत्रपतींचे पुत्र राजाराम महाराज यांनी १६९५ मध्ये हे मंदिर बांधले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील एकमेव असे ‘शिवराजेश्वर मंदिर’ आहे. या मंदिराच्या परिसरात शिवाजी महाराज यांच्या ‘पायांचे ठसे’ जतन करून ठेवण्यात आल्याचे म्हटले जाते. गेल्या वर्षी मंदिराचे पावित्र्य आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हे मंदिर चर्चेत आले होते. हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. मंदिरासाठी गेली ५५ वर्षे सरकारकडून दरमहा २५० रूपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात होता. मंदिराच्या देखभालीसाठी १९७० साली महसूल आणि वन विभागाने हे अनुदान ठरवून दिले होते. यात त्यानंतर वाढच करण्यात आलेली नव्हती.

या अनुदानात मंदिरातील दिवाबत्ती, वीजदेयके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा मुलभूत गरजा भागविणेही शक्य होत नव्हते. म्हणून मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या श्री. शिवराजेश्वर देवस्थान न्यासातर्फे फेब्रुवारी, २०२०मध्ये देवालयातील पुजारी, सेवेकरी यांचे वेतन व मंदिरातील दिवाबत्तीचा खर्च, मंदिरात होणारे उत्सव याकरिता अनुदानाची रक्कम कमी पडत असल्याने त्यात वाढ करण्याची विनंती केली होती. पाच वर्षांनी या निवेदनाची दखल घेत सरकारने दरमहा २५० रूपये असलेले मानधन आता दरमहा ८ हजार ३३३ रूपये याप्रमाणे वर्षाला एक लाखांवर नेले आहे. मंदिरातील पुजारी, सेवेकरी यांचे मानधन, दिवाबत्तीचा खर्च म्हणून हे मानधन दिले जाणार आहे.

मंदिराविषयी

राजाराम महाराज यांनी १६९५ मध्ये हे मंदिर बांधले. पुढे १९०६-०७ च्या सुमारास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मंदिराचा भव्य आणि प्रशस्त सभा मंडप बांधला. इतरत्र आढळून येणारी शिवरायांची बहुतांश चित्रे दाढी-मिशांसह दिसतात, मात्र शिवराजेश्वर मंदिरातील मूर्तीला दाढी नाही तर केवळ मिशा आहेत. शिवरायांची मूर्ती पद्मासनात बसलेली असून, एक हात गुडघ्यावर आहे आणि दुसऱ्या हाताने ते आचमन करत आहेत. डोक्यावर जिरेटोपाऐवजी ‘मंदिल’ आहे. शिवजयंतीच्या दिवशी कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्याकडून आणि कांदळगावच्या श्री देव रामेश्वर देवस्थानकडून मंदिरातील मूर्तीसाठी जिरेटोप, वस्त्रे आणि अलंकार दिले जातात.