मुंबई पोलिसांची कारवाई करण्याची ग्वाही

गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारा गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. चेन्नई येथील एका तरुणीच्या हत्येवरून केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देणाऱ्या महिला पत्रकाराला अभिजीतने शनिवारी रात्री अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या शिवीगाळीकडे पत्रकाराने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून लक्ष वेधले असता पोलिसांनी तिला नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची सूचना करत कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

चेन्नईमध्ये इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर हत्या झाली होती. या हत्येचा तपास सुरू असून गायक अभिजीत भट्टाचार्य याने शनिवारी सायंकाळी हा हल्ला ‘लव जिहाद’चा एक भाग असल्याचे ट्विट केले. यावर अनेक ट्विटरकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. दिल्लीस्थित महिला पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनीही अभिजीतच्या ट्विटवर आक्षेप घेत, समाजात तेढ निर्माण करणारे ट्विट केल्याने अभिजीतला तुरुंगात टाकायला हवे, असे ट्विट केले. अभिजीतने याला प्रत्युत्तर देताना पातळी सोडत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्यावर टीका करणाऱ्या अनेकांवर त्याने यथेच्छ शेरेबाजी केली. अभिजीत याच्या ट्विटकडे पत्रकार चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत लक्ष वेधले. मुंबई पोलिसांनी चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधत त्यांना मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना केली. आपण दिल्लीत असल्याचे सांगितले असता पोलिसांनी त्यांना दिल्लीतील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. महिला पत्रकाराने तक्रार नोंदविल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. अभिजीत ट्विटमुळे अनेकदा अडचणीत आला असून अनेक वाद त्याने ओढवून घेतले आहेत.