विनोद तावडे यांची विधानसभेत माहिती
सिंहगड संस्थेत अध्यापक व कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची जबाबदारी ही संस्थेचीच असल्याचे स्पष्ट करत, याबाबत स्थानिक पातळीवर संबंधितांना कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विननोद तावडे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले.
सिंहगड अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत अध्यापक व कर्मचाऱ्यांना एकीकडे सात सात महिने वेतन देण्यात आलेले नसताना, संस्थापक अध्यक्षांनी १४ डिसेंबर २०१५ रोजी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात गृहनिर्माण सदनिका आरक्षित केल्यास त्यापोटी कर्मचाऱ्यांना काही रक्कम दिली जाईल तसेच शासनाकडून १२१ कोटी ८० लाख रुपयांचे येणे बाकी असल्याने वेतन देण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले होते का, असा प्रश्न आमदार तृप्ती सावंत, शरद सोनावणे, सरदार तारासिंग, संजय केळकर, पराग अळवणी, प्रशांत ठाकूर व संजय केळकर आदींनी उपस्थित केला होता. पुण्यातील सिंहगडसह राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही वेतन वेळेवर मिळत नसल्याबाबतचा प्रश्न या आमदारांनी उपस्थित केला. उत्तरादाखल अध्यापक-कर्मचाऱ्यांची वेतन थकबाकी असून शासनाकडूनही १२१ कोटी ८० लाख रुपयांचे देणे सिंहगड संस्थेला असल्याचे विनोद तावडे यांनी मान्य केले. तसेच सिंहगडमधील वेतनप्रकरणी सर्व जबाबदारी संस्थेची असून याबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाची एक समितीही सिंहगडमध्ये जाऊन चौकशी करून आल्याचे त्यांनी सांगितले.