महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजविण्यासाठी फुलांबरोबरच अनेक जण दागिन्यांचाही वापर करतात. यामध्ये इमिटेशन ज्वेलरीपासून सोने आणि चांदीच्या दागिन्यांनाही विशेष महत्त्व असते. घरगुती गणपतीला दागिन्यांनी सजविण्याबरोबरच मोठमोठ्या मंडळाच्या गणपतींनाही दागिने घातले जातात. मुंबईच्या सायन येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

जीएसबी गणपतीला ७० किलो सोनं आणि ३५० किलो चांदीने मढविण्यात आलं आहे. जीएसबी गणपतीवरील सर्व सोनं २३ कॅरेटचे आहे. इतके सोने असल्यामुळे मंडळाकडून विशेष सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत. सुरक्षा जवानांबरोबरच यंदा सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. यावर्षी जीएसबी गणपतीने २६६.६५ कोटी रूपयांचा विमा काढला आहे.

गौड सारस्वत ब्राह्मण समाजाने १९५४मध्ये जीएसबी मंडळाची स्थापना केली होती. पाचव्या दिवशी या गणपतीचे मोठ्या उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्धपणे विसर्जन केले जाते.  ७ वाजता किंग्ज सर्कल येथून प्रस्थान होणार आहे. त्यानंतर दादर स्टेशन, प्लाजा थेटर, प्रभादेवी, हाजी अली, ताडदेवमार्गे सकाळी पाच वाजता गिरगाव चौपाटीला पोहचणार आहे.

Story img Loader