मुंबई: श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या चेंबूरमधील तीन महिन्याच्या मुलीचा १५ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चेंबूरमधील खारदेव नगर परिसरात वास्तव्याला असलेले रवी कोल्हे यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला ३ फेब्रुवारीला अचानक खोकला आणि ताप आला. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा तिला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला पुढील उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र याचदरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिल्यानंतर अचानक मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी कुटुंबियांनी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवले आहे. मुलीवर चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद घेऊन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसांत समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर या मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. – डॉ. प्रमोद इंगळे, अधीष्टाता, शीव रुग्णालय