मुंबई : शीव रुग्णालयाच्या मुख्य बाह्यरुग्ण कक्षाच्या शेजारी असलेल्या रेडिओलॉजी विभागातील एसीमध्ये मंगळवारी सकाळी ११.५७ च्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. स्फोट होताच रेडिओलॉजी विभागातील रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवितहानी टळली.शीव रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ७ च्या समाेर असलेल्या मुख्य बाह्यरुग्ण विभागाच्या शेजारच्या इमारतीच्या तळमजल्यावर रेडिओलॉजी विभाग आहे.
या विभागातील सर्वात शेवटच्या एका खोलीतील वातानुकूलित यंत्रणेत सकाळी ११.५७ च्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर त्या खाेलीमध्ये आग लागली. त्यमुळे त्या खोलीतून मोठ्या प्रमाणात धूराचे लाेट बाहेर पडू लागले. विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत रुग्णांना बाहेर काढले, तसेच आग विझविण्यास सुरुवात करत अग्निशमन दलाला पाचारण केले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी, तसेच रुग्णालयातील अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर पोहचून आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
या घटनेमुळे रुग्णालयातील काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर सुरळीत करण्यात यश आले.
