मुंबई : शीव पनवेल मार्गावर मंगळवारी रात्री उड्डाणपूलासाठी खोदकाम करणारे यंत्र कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार व सल्लागाराने आवश्यक काळजी घेतली होती का, या प्रकरणी दुर्लक्ष झाले आहे का याची मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.तसेच या प्रकरणी उड्डाणपुलाच्या कंत्राटदाराला एक कोटीचा दंड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
तसेच सल्लागारावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.सायन पनवेल महामार्गावरील महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे मुंबई महापालिकेच्यावतीने उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू आहे. घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलाला जोडणारे दोन नवीन
उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. यामध्ये घाटकोपर मानखुर्द परिसरातून सायन पनवेल महामार्गावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीसाठी एक मार्ग तर वाशीकडून घाटकोपर, ईईएच, जीएमएलआर फ्लायओव्हर (टी जंक्शन येथे दुसऱ्या स्तरावरील) यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुसरा मार्ग असे दोन नवीन उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या उन्नत मार्गासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी मोठे यंत्र या मार्गावर आणले जात असताना मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. या अपघात एका पोलिसाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हे अवाढव्य यंत्र रस्त्यात पडल्यामुळे बुधवारी दिवसभर सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी होती. अनेक वाहनांमध्ये प्रवासी पाच ते सहा तास अडकून पडले होते. या प्रकरणी आता मुंबई महापालिकेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पालिका उपायुक्तांमार्फतही चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कंत्राटदाराला एक कोटीचा दंड करण्यात येणार आहे. तसेच सल्लागारावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.- अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त
