मुंबईहून पुणे, गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना फायदेशीर ठरणाऱ्या शीव -पनवेल महामार्गाच्या दहा पदरी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आह़े  त्यामुळे हा मार्ग आता एक जुलैपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होणार असल्याचे समजते. या मार्गात महत्वाचा टप्पा असलेल्या बेलापूर खिंडीजवळील उड्डाणपूलाच्या दोन मार्गिका सोमवारी वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. या मार्गावर खारघर स्पेगटीजवळ टोल नाका वसविण्यात येणार आहे. तो कधी सुरू होणार याबाबत अद्याप संदिग्धता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधा, वापरा, हस्तांतरण करा तत्त्वावर या २३ किमी लांबीच्या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. दहा मार्गिकेच्या या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंटक्रॉक्रिटीकरणावर एक हजार २२० कोटी रुपये खर्च झालेले आहेत. कंपनीच्या काही खासगी कारणास्तव नऊ महिने उशिरा सुरू झालेल्या या रस्त्याचे काम मे २०१४ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती, पण ते आता दोन महिने उशिराने का होईना पूर्ण होत आहे. या मार्गात पाच उड्डाणपूलांचे काम सातत्याने वाहतूक सुरू असताना पूर्ण करण्यात आले आहे. एक जूलै रोजी हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे कंत्राटदार कंपनीच्या सूत्राने सांगितले. बेलापूर खिंडीतील उड्डाणपूलावरील पुण्याहून येणाऱ्या दोन मार्गिकेचे काम अद्याप बाकी असून ते येत्या आठ दिवसात होण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.