सायन- पनवेल मार्गावर अवजड वाहनांना टोलमुक्ती?

राज्य सरकारने ६०० कोटी थकवल्याने कंपनीचा निर्णय

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्य सरकारने ६०० कोटी थकवल्याने कंपनीचा निर्णय

वारंवार आश्वासने देऊनही टोल सवलतीपोटीचे ६८९ कोटी रूपये देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत सायन- पनवेल मार्गावरील टोलवसुली शुक्रवार २९ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून थांबविण्याचा निर्णय सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड (एसपीटीपीएल) कंपनीने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो अवजड वाहनांना मोठा दिलासा मिळणार असला तरी राज्य सरकारवर मात्र मोठा आíथक बोजा पडणार आहे.

राज्यात सत्तेवर आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा वास्तवात आणताना राज्य सरकारने १२ टोलनाके कायमचे बंद करून ५३ टोलनाक्यावरून हलक्या वाहनांना टोलमधून माफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सायन- पनवेल मार्गावरील टोलनाक्यावरून हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली. त्या बदल्यात कंपनीस नुकसान भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार या कंपनीने शासनाकडे ६८९ कोटी रूपयांची मागणी केली असून फेब्रुवारी पासून राज्य सरकारने एक रूपयाचीही नुकसान भरपाई दिलेली नसल्याचा कंपनीचा आरोप आहे. वारंवार मागणी करूनही सरकार पैसे देत नसल्याने आता हा प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यानुसार २९ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून टोलवसुली बंद करण्यात येणार असून सरकारने प्रकल्प ताब्यात घ्यावा अशी नोटीस कंपनीने सरकारला पाठविली आहे. तसेच सरकारने हा प्रकल्प ताब्यात घेतला नाही तर एक एकतर्फी मानीव हस्तांतरण केले जाईल असेही कंपनीने सरकारला बजावले आहे. तर पावसाळ्यात हा रस्ता खुप खराब झाला होता. त्याची दुरूस्ती सरकारने केली असून कंपनीला दुरूस्तीचा खर्च देण्याचा प्रश्नच येत नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sion panvel highway toll free