मुंबई : शीव – पनवेल मार्गावर मंगळवारी रात्री कोसळलेले खोदकाम करणारे यंत्र रस्त्यावरून हटविण्याचे काम बुधवारी हाती घेण्यात आले होते. मात्र वेळीच यंत्र हटविण्यात यश न आल्याने शीव – पनवेल मार्गावर तब्ब १० तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. अनेक वाहनचालक सहा ते सात तास वाहतूक कोंडीत अडकले होते. यंत्रणांचे नियोजन आणि परस्परांमधील समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकराना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी शीव-पनवेल महामार्गावर महापालिकेने उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान रस्त्याच्या बाजूला भलेमोठे खांब उभारण्यासाठी मोठ्या यंत्राने खोदकाम करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास येथे खोदकाम सुरू होते. यावेळी खोदकाम करणारे यंत्र अचानक रस्त्याच्या मधोमध कोसळले. यावेळी दुचाकीवरून जाणारे पोलिस शिपाई संतोष चव्हाण (४३) यांच्यावर यंत्र कोसळले आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
कोसळलेले यंत्र मंगळवारी रात्रभर रस्त्यावरच पडून होते. हे यंत्र बुधवारी दुपारी २ च्या सुमारास रस्त्यावरून हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी दोन मोठ्या क्रेन घटनास्थळी आणण्यात आल्या होत्या. या दोन्ही क्रेन रस्ताच्या मधोमध उभ्या केल्याने शीव आणि घाटकोपर परिसरातून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अर्धा ते पाऊण तासात हे काम होईल, अशी माहिती तेथे काम करणाऱ्या कंत्राटदाराने वाहतूक पोलिसांना दिली होती. मात्र दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ७ पर्यंत हे काम सुरूच होते. त्यामुळे मुंबईतून बाहेर जाणारे सर्व मार्ग ठप्प झाले होते.
शीव – पनवेल महामार्ग ठप्प झाल्याने अनेकांनी पूर्व द्रुतगती मार्गाचा पर्याय निवडला. मात्र सायंकाळी या मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय अनेक वाहनचालकांनी अंतर्गत रस्त्याने जाणे पसंत केले. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतुकही पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी, वाहनचालकांना चार ते पाच किलोमीटरसाठी सहा – तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले होते. अखेर बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली.
मुळात मंगळवारी रात्रीच हे यंत्र रस्त्यावरून हटवण्याची गरज होती. बुधवारी दिवसा रस्त्यावर इतका वेळ क्रेन उभी करण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. या बाबत कल्पना असती तर त्यांना परवानगीच दिली नसती.- प्रियंका नारनवरे, अप्पर पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग
