मुंबई : शीव – पनवेल मार्गावर मंगळवारी रात्री कोसळलेले खोदकाम करणारे यंत्र रस्त्यावरून हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परिणामी, या मार्गावर बुधवारी दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालक तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकले होते.
मानखुर्द परिसरात उड्डाणपुलाच्या खोदकामासाठी आणलेले भलेमोठे यंत्र मंगळवारी रात्री रस्त्यावर पडले. परिणामी, मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हे यंत्र बुधवारी दुपारी रस्त्यावरून हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी शीव-पनवेल मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर शीवपासूनच कोंडी झाली होती. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी चेंबूर, गोवंडी आणि देवनार परिसरातील लहान रस्त्यांवरून जाणेपसंत केले. परिणामी, अंतर्गत रस्त्यांवरही बुधवारी रात्रीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
चेंबूर येथून मानखुर्द परिसरात जाण्यारे अनेक वाहन चालकांना तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकले होते. १५ ते २० मिनिटांच्या या अंतरासाठी इतका वेळ लागत असल्याने वाहन चालक संतप्त झाले होते. अखेर सायंकाळी ७ च्या सुमारास हे यंत्र रस्त्यावरून हटविण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
