मुंबई : शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. तसेच रस्ते काँक्रिटीकरण कामे करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. तसेच ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही नवीन खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्याची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्त्यांची सर्व कामे दिनांक ३१ मेपर्यंत पूर्ण करुन रस्ते वाहतुकीस खुले करावेत, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी शहर विभागातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात धारावी येथील ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल, शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे, चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींचा समावेश आहे. या पाहणीवेळी त्यांनी विविध आदेश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यावेळी उपस्थित होते.
शीव (सायन) उड्डाणपुलाला जुलैचा मुहूर्त
शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्प स्थळाची महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. रेल्वे विभागाकडून पोलादी तुळया स्थापित करण्याकामी (Girder Launching) १५ दिवसांचा विलंब झाला आहे. अगोदरच्या नियोजनानुसार ३० एप्रिलपर्यंत तुळया स्थापित करणे अपेक्षित होते. ते काम आता दिनांक १५ मेपर्यंत लांबणीवर गेले आहे. पहिली तुळई स्थापित करण्याचे काम लांबणीवर गेले असले तरी इतर अनुषंगिक कामांमध्ये हा विलंब भरून काढावा आणि दिनांक ३१ मेपर्यंत दोन्ही तुळया स्थापित करण्याची कार्यवाही सुनिश्चित करावी, असे आदेश भिडे यांनी दिले. महानगरपालिका पूल विभाग आणि रेल्वे विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दिनांक १५ जुलैपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी, असेदेखील भिडे यांनी सांगितले.
