मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील ब्रिटीशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपूलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण होत आले असून जुलै महिन्यात हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्याचे उद्दीष्ट्य मुंबई महापालिका प्रशासनाने ठेवले आहे. पादचाऱ्यांना पूर्व – पश्चिम येण्याजाण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दोन भुयारी पादचारी मार्गांपैकी एक भुयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

मध्य रेल्वेच्या शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणाऱ्या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाची कामे वेगाने सुरू आहेत. उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्प स्थळाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. पादचा-यांना पूर्व – पश्चिम येण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दोन भुयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असेदेखील बांगर यांनी स्पष्ट केले.

शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग , दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे पुलाच्या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिम बाजूची सर्व कामे दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्वे प्रशासनाकडून दिनांक ३१ मेपर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्त्याचा ताबा महानगरपालिकेला मिळणे अपेक्षित असल्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी त्यानंतर आणखी काही कालावधी आवश्यक आहे. त्याचा विचार करता या पुलाची सर्व कामे दिनांक १५ जुलैपर्यंत पूर्ण केली जातील व पूल वाहतुकीस खुला केला जाईल, असे बांगर यांनी सांगितले.

महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळ्ये तसेच मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित मेहला यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.

अभियंत्यांनी दररोज उपस्थित राहावे

महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतरपद्धतीने करावीत. प्रकल्पाच्या कालमर्यादेचे पालन करावे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनासमवेत उच्च प्रतीचा समन्वय साधावा. कामाचे सुयोग्य व सुक्ष्म नियोजन करावे, अभियंत्यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.