मुंबई : मुंबई – ठाणे हा भारतातील पहिला व्यावसायिक प्रवासी रेल्वेमार्ग असून, या ऐतिहासिक मार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेल्या शीव स्थानकावरील ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (जीआयपीआर) काळातील वारसा वस्तू मध्य रेल्वेने सुरक्षित जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी स्थानकावरील जुनी इमारत हटवण्यात येत असली, तरी त्यातील ऐतिहासिक वस्तू काळजीपूर्वक लोणावळा येथील वारसा संकलन केंद्रात संरक्षित केल्या जाणार आहेत.
अतिरिक्त रेल्वेमार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमुळे जीआयपीआर काळातील मूळ ब्रॅकेट, धातूचे घटक आणि स्थापत्य अवशेष नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक इतिहासाच्या अभ्यासकांनी पुढाकार घेत रेल्वे मंडळाच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून वारसा जतनाची मागणी केली होती.
जीआयपीआर काळातील बांधकाम किंवा मूळ घटक हेरिटेज मूल्यांकनाशिवाय पाडू नयेत, तसेच छायाचित्रण, मोजमाप, दस्तऐवजीकरण आणि सूचीकरण करून शक्य असल्यास जागेवरच जतन करावे, अन्यथा सुरक्षितपणे संग्रहालयात ठेवावे, अशी त्यांची मागणी होती. रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार; तसेच ‘रेल एन्थुझियास्ट सोसायटी’ आणि वारसा अभ्यासकांच्या मागणीनंतर पाडकामापूर्वी इमारतीतील ऐतिहासिक वस्तू काळजीपूर्वक काढून सुरक्षित ठेवण्यात आल्या. या सर्व वस्तू वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
जतन करण्यात आलेल्या वस्तू
मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता कार्यालयाच्या माहितीनुसार, मार्गिका विस्तारासाठी इमारत हटवणे अपरिहार्य होते. त्यामुळे वारसा मूल्य असलेल्या सर्व वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी विखुरून न ठेवता एकाच ठिकाणी सुरक्षित जतन करण्यासाठी त्या लोणावळ्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात या वस्तू वारसा प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचाही रेल्वेचा मानस आहे. पाडकामापूर्वी इमारतीतील ऐतिहासिक वस्तू सुरक्षितपणे काढून वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यामध्ये जीआयपीआर बोधचिन्ह असलेल्या १८ त्रिकोणी कास्टिंग ग्रिल्स, १८ लाकडी वक्र नक्षीकाम केलेले भाग, एक लाकडी तिकीट खिडकीची चौकट, कास्ट-आयर्न रूफ ब्रॅकेट्स, जुने खांब, ऐतिहासिक घंटा आणि इतर स्थापत्य घटकांचा समावेश आहे.
लोणावळ्यात वारसा संकलन
मध्य रेल्वेने या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी न ठेवता लोणावळा येथील वारसा संकलन केंद्रात जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही ब्रिटिशकालीन वाफेवर चालणारी क्रेन, स्टोन क्रशर मशीन, पहिले इलेक्ट्रिक इंजिन, हँड-ट्यूब फायर इंजिन, काँक्रीट मिक्सर आणि जुनी प्रिंटिंग प्रेस यासारख्या ऐतिहासिक वस्तू तेथे स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. भविष्यात शीव स्थानकातील वस्तूंचेही वारसा प्रदर्शनातून नागरिकांना दर्शन घडवण्याची योजना आहे.
१९ व्या शतकाच्या स्थापत्याचे दुर्मीळ पुरावे
शीव स्थानकावरील लोखंडी ब्रॅकेट्स, जीआयपीआर बोधचिन्ह असलेल्या ग्रिल्स आणि लाकडी नक्षीकाम हे १९व्या शतकातील रेल्वे स्थापत्यशैलीचे दुर्मिळ नमुने मानले जातात. वारसा अभ्यासकांच्या मते, आधुनिक रेल्वे प्रकल्पांसोबत ऐतिहासिक घटकांचे संवर्धन केल्यास भारतीय रेल्वेच्या सुरुवातीच्या इतिहासाचे महत्त्वाचे भौतिक पुरावे भावी पिढ्यांसाठी जतन राहतील.
