मुंबई : शीव कोळीवाड्यातील ७५ वर्षीय केसरादेवी सोमनाथ गुप्ता यांची झोपडपट्टी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. पुनर्वसित इमारतीतील घराचा ताबा मिळावा यासाठी गुप्ता कुटुंब १५ वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करत होते. अखेर या प्रकरणी न्यायालयाने प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर दोन अधिकाऱ्यांना फटकारले. त्यांच्याविरोधात अवमान याचिका बजावल्या. त्यानंतर प्राधिकरणाला जाग आली असून सोमवारी केसरादेवी यांच्यासह अन्य चार कुटुंबांना घराचा ताबा देण्यात आला आहे.

झोपु योजनेअंतर्गत शीव कोळीवाडा येथील इंदिरा नगरमधील झोपडी केसरादेवी गुप्ता यांनी २०११ मध्ये रिकामी केली. त्यानंतर त्यांचे तात्पुरते स्थलांतर कोळीवाड्यातील संक्रमण शिबिरातील गाळ्यात करण्यात आले. काही वर्षांनी त्यांची पुनर्वसित इमारत उभी राहिली, मात्र, त्यांना या इमारतीत हक्काचे घर मिळाले नाही. त्यांनी घरासाठी झोपु प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घर दिले जात नसल्याने अखेर २०२५ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तर झोपु योजनेतील आणखी एका रहिवाशानेही घर दिले जात नसल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल केली. या दोन रहिवाशांसह अन्य तीन रहिवाशांनाही घराची प्रतीक्षा होती.

दरम्यान, केसरादेवी गुप्ता यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्राधिकरणाच्या विशेष कक्षाने केसरादेवी यांची तक्रार ऐकून त्यांच्या तक्रारीचे योग्य निवारण करावे, असे निर्देश दिले. मात्र, विशेष कक्षाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पुढील सुनावणीत अनेक ज्येष्ठ नागरिक वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये राहत असून झोपु प्राधिकरणाच्या तक्रार निवारण विशेष कक्षात त्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तक्रार निवारण कक्षातील दोन अधिकाऱ्यांना अवमान नोटीस बजावली. तर न्यायालयाने ५० हजार रुपये दंडही ठोठावला होता.

पाच कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण

न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर सोमवारी केसरादेवी गुप्ता यांना झोपु प्राधिकरणाकडून पुनर्वसित इमारतीतील घराचा ताबा देण्यात आला आहे. इतर चार कुटुंबांनाही ताबा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केसरादेवी यांना शीव कोळीवाड्यातील पुनर्वसित इमारत क्रमांक ४, सी विंग, सदनिका क्रमांक २१० वितरित करून त्यांना घराची चावी देण्यात आली. केसरादेवी यांच्यासह अन्य चार कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.