मुंबई : सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाची पायरी म्हणून सर जे. जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू करण्यात आली असून, गेल्या ४० दिवसांत येथे ३० रुग्णांवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियेसाठी तीन ते पाच लाखांपर्यंत खर्च येतो तर जे.जे. रुग्णालयात या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत.

भारतातील रोबोटिक सर्जरी क्षेत्रात गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती झाली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, कमी वेदनादायक आणि जलद पुनर्प्राप्तीसाठी उपयुक्त ठरत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने हे रोबोटेक तंत्रज्ञान जे.जे. रुग्णालयात सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे ३२ कोटी रुपये खर्चन ही तंत्रज्ञान प्रणाली रुग्णालयात बसविण्यात आली. ९ एप्रिल रोजी रुग्णालयात पहिली रोबोटेक शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर गेल्या ४० दिवसात ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.

या रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णांचे अचूक निदान, कमी रक्तस्राव, कमी वेदना आणि लवकर बरे होण्याचा फायदा होतो. जनरल सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांंनी या शस्त्रक्रिया केल्या असून आतापर्यंत गॅल ब्लॅडर, हर्निया, पॅनक्रिया आणि इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटिक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. लवकरच यामध्ये यकृत, मूत्रपिंड, मूत्रमार्ग, गर्भाशय व स्तनाच्या शस्त्रक्रिया देखील सुरू होतील. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे रुग्णांचे आरोग्य अधिक चांगले राखले जाऊ शकते तसेच रुग्ण लवकर रुग्णालयातून घरी जाऊ शकतो, असे डॉ भंडारवार यांनी सांगितले. मूत्रविकार विभाग व स्त्री रोगशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनाही आता रोबोटिकचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे जे.जे. रुग्णालयाने सार्वजनिक आरोग्यसेवेत एक नवीन मापदंड स्थापित केला असून गरीब रुग्णांसाठी ही सेवा महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत देण्याचा आमचा प्रयत्न असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केल्याचे डॉ भंडारवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील रोबोटिक सर्जरी क्षेत्र वेगाने विकसित होत आहे, आणि शासकीय रुग्णालयेही या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, रुग्णांना अधिक अचूक, कमी वेदनादायक आणि जलद पुनर्प्राप्तीची शक्यता असलेली शस्त्रक्रिया मिळू शकते. सरकारच्या पुढाकारामुळे आणि तंत्रज्ञानाच्या स्वीकारामुळे, भविष्यात रोबोटिक सर्जरी अधिक व्यापकपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.जे.जे.मधील पहिल्या ५०० रोबोटिक शस्त्रक्रियांचा खर्च रोबो पुरविणारी कंपनीच उचलणार आहे. या ५०० शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले योजनेतून या शस्त्रक्रियांचा भार उचलला जावा यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला असल्याचे अधिष्ठाता डॉ अजय भंडारवार यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियेसाठी पावणेदोन लाख ते पावणेसहा लाखांपर्यंत खर्च येतो. भारतात सुमारे १०० हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया यंत्रणा कार्यरत असून दरवर्षी सुमारे १२ हजार ते १५ हजार रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात. प्रमुख शहरांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असली तरी सरकारी रुग्णालयांमधून मोफत सेवा देणारे जे. जे. रुग्णालय हे आगळेवेगळे ठरत आहे.