मुंबई: राज्यात राबविण्यात आलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतून तब्बल ३१.२५ टक्के म्हणजेच ९० हून अधिक विधानसभा मतदारसंघांतील राजकीय समिकरणे येत्या काळात बदलण्याचे संकेत मिळत आहेत. या विधानसभा मतदार संघातील २५ टक्के पेक्षा अधिक मतदारांनी एसआयआरकडे पाठ फिरविली असून आयोगाने घरोघरी जाऊन दिलेली गणना प्रपत्र भरुन दिलेली नसल्याने त्यांची नावे ३१ ऑगस्ट रोजी जाहिर होणाऱ्या प्रारुप मतदार यादीतून वगळली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, ठाणे, मुंबई, पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राज्यात मतदार यांद्याच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेतून तब्बल २ कोटी ०७ लाख मतदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ५० हजार(७८.८५ टक्के) मतदारांकडून स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून सुमारे २ कोटी ०७ लाख (२१.१५) टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत. प्रपत्र जमा झालेले नाही त्यामध्ये ७५ लाख ५२ हजार (७.७२ टक्के) मतदार त्यांच्या मतदार यादीतील पत्यावर आढळून आलेले नाहीत. ७६ लाख ८० हजार(७.८५ टक्के) मतदारांनी कायमस्वरुपी स्थलांतर केल्याचे आढळून आले असून ३४ लाख ८१ हजार(३.५६ टक्के) मृत मतदारांची नावे मतदार यादीत आढळून आली. अन्यत्र नोंदणी किंवा दुबार मतदारांची संख्या १७ लाख ६३ हजार आहे.

एसआयर मोहिमेत गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांचा विधानसभा मतदार संघ निहाय तपशील आयोगाने आता जाहीर केला आहे. त्यामध्ये ९० हून अधिक विधानसभा मतदार संघामध्ये २५ ते ४७ टक्के पर्यंत मतदारांनी गणना प्रपत्र जमा केली नसल्यान त्यांची नावे प्रारुप मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. खान्देशातील धुळे शहर,जळगाव शहर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम तसेच विदर्भातील अकोला पश्चिम, नागपूरातील हिंगणा, नागपूर नैऋत्य, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व मागपूर मध्य नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर आणि कामठी या मतदार संघात ३५ ते ४० टक्के मतदारांनी गणना प्रपत्र भरुन न दिल्याने त्यांची मतदार यादीतून नावे रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मराठवाडयातील नांदेड उत्तर, जालना, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदार संघात ३०-३२ टक्के मतदारांनी एसआयआरकडे पाठ फिरविल्याने त्यांची नावे मतदार यादीतून रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पालघरमधील बोईसर, नालासोपार,वसई, ठाणे जिल्हयातील भिवंडी पश्चिम,भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा- भाईंदर, ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा- कळवा, एरोली, बेलापूर या मतदार संघात ३५ ते ४५ टक्के पर्यंत मतदार मतदारयादीतून वगळले जाणार आहेत.

मुंबईतील सर्वच मतदार संघातही ४० टक्के पेक्षा अधिक मतदारांनी एसआयआरडे पाठ फिरविली असून कुलाबा मतदार संघात तर ४७ टक्के मतदार प्रारुप मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती पूणे जिल्हयातील विविध विधानसभा मतदार संघात आहे. पिंपरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, हडपसर या मतदार संघातही ४० ते ४५ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा न केल्याने त्यांची नावे प्रारुप मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात.