येचुरी यांची संघपरिवारावर टीका; धोरणाने जनतेत संताप
देशापुढील गंभीर आर्थिक परिस्थिती तसेच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आलेले अपयश यावरून सामान्यांचे लक्ष विचलित करण्याकरिताच भाजपकडून राष्ट्रवादाचा मुद्दा मांडण्यात येत असल्याचा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी रविवारी केला. हिंदू राष्ट्राची रा. स्व. संघाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनेच भाजप सरकारची पावले पडत असल्याची टीकाही त्यांनी केली.
हिटलरच्या वंशवादाच्या धोरणाशी सुसंगत अशी धोरणे सध्या भाजपकडून राबविली जात असल्याचा आरोपही येचुरी यांनी एका परिसंवादात बोलताना केला. सर्वसामान्य जनतेच्या प्रखर राष्ट्रवादाच्या भूमिकेचा भाजपकडून दुरुपयोग केला जात आहे. आपला कार्यक्रम राबविण्याकरिता राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणला जात आहे. देशाची आर्थिक परिस्थिती तेवढी भक्कम नाही. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी जनतेच्या अपेक्षा खूपच वाढविल्या होत्या व त्या पूर्ण करणे सरकारला शक्य होत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे सहा लाख कोटींची कर्ज बुडीत निघाली आहेत. अशा परिस्थितीत खासगी बँकांना मदत होईल अशी या सरकारची भूमिका आहे. मोदी सरकारच्या २२ महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये २६ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात मोठय़ा प्रमाणावर घसरण होऊनही देशातील ग्राहकांना त्याचा काहीच लाभ झालेला नाही. देशातील जनतेत सरकारच्या आर्थिक धोरणांवरून संतापाची भावना आहे. लोकांचा रोष वाढू नये या उद्देशानेच मोदी सरकारने राष्ट्रवादाच्या चर्चेला प्राधान्य देऊन भावनात्मक मुद्दय़ाला हात घातल्याचा आरोप येचुरी यांनी केला.
स्वातंत्र्यलढय़ात कम्युनिस्ट होते कोठे, अशी हेटाळणी भाजपकडून केली जाते. पण १९४२च्या छोडो भारत आंदोलनात डाव्या नेत्यांचा सक्रिय सहभाग होता. उलट रा. स्व. संघाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यलढा किंवा १९४२च्या आंदोलनात सहभागी झाले नव्हते याकडे येचुरी यांनी लक्ष वेधले. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पैशाचा अपव्यय किंवा गैरवापर केला जात असल्याचा शोध काही भाजपच्या मंडळींनी लावला आहे. देशातील प्रशासकीय, पोलीस, परराष्ट्र सेवा आदी महत्त्वाच्या सेवांमध्ये जेएनयूमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले सापडतील. एवढी मंडळी महत्त्वाच्या पदांवर असताना जेएनयूमध्ये पैशांचा गैरवापर झाला असे कसे म्हणणार, असा सवालही केला.