मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पावसाची हजेरी आहे. मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आजही मुंबईत झाड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटना ताज्या असतानाच आता मुंबईतल्या मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तळमजला आणि त्यावर दोन मजले अशी चाळ मानखुर्द भागात होती. तिचा भाग कोसळला आणि सहा जण ठार झाले आहेत. जो ढिगारा या ठिकाणी जमा झाला आहे त्याखाली आणखी कुणी अडकलं आहे का? याचाही शोध घेतला जातो आहे. अग्निशमन दलाचे जवान भर पावसात मदत आणि बचावकार्य राबवत आहेत.

नेमकी काय घटना घडली?

मानखुर्दमध्ये तळ मजल्यासह एकूण तीन मजली चाळीचा भाग कोसळला. रात्री ८.३० च्या दरम्यान ही घटना समोर आली. यामध्ये ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती, मानखुर्द मधील हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात तळमजला अधिक तीन मजली (G+3) चाळीच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चाळ क्रमांक ५ मधील दोन ते तीन घरांचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत होती. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, संबंधित विभागाचे कर्मचारी तसेच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा दाखल झाली असून, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अखेर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये चार महिलांचा समावेश

तीन मजली चाळीचा भाग कोसळून आत्तापर्यंत ६ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण सहा मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. पाच जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात तर एकाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तर या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, अशीही माहिती समोर येते आहे. ताशी ७२ ते ७५ किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे किंवा फांद्या पडण्याच्या एकूण १३० हून अधिक घटनांची नोंद झाली. या संपूर्ण परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अविरतपणे कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.