मालाड रेल्वे स्टेशनच्या झुडुपामध्ये सोमवारी रेल्वे कामगारांना एक मानवी सांगाडा सापडला. या सांगाडयावर स्त्रीचे कपडे होते. त्यामुळे तो महिलेचा मृतदेह असण्याची शक्यता असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. हा मृतदेह कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

सांगाडयावर स्त्रीचे कपडे असल्यामुळे तो महिलेचाच मृतदेह आहे असे म्हणता येणार नाही. तो तृतीयपंथीयाचाही मृतदेह असू शकतो असे तज्ञांनी सांगितले. सांगाडयाच्या डीएनए विश्लेषणांवरुन लिंग, वय शोधून काढता येईल असे तज्ञांनी सांगितले. मालाड रेल्वे स्टेशनच्या उत्तरेला ट्रॅक नंबर २ आणि ३ च्या मध्ये झुडुपात हा सांगाडा सापडला.

सध्या इथे १५ डब्ब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. रेल्वे कामगार झुडुपे हटवत असताना त्यांचे या सांगाडयावर लक्ष गेले. लाल रंगाचा टॉप आणि ओढणी या सांगाडयावर होती. कामगारांनी लगेच रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. मृत व्यक्तीची उंची चार ते साडेचार फूट असावी. मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून हा सांगडा इथे असावा असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाच्या न्यायवैद्यक तपासणीतून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या बोरीवली रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.