मुंबई : मागील काही दिवसांपासून भारतातील उत्तरेच्या राज्यांसह महाराष्ट्रावरही पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे नागरिकांना यंदाचा मान्सून कसा असेल याची चिंता सतावू लागली आहे. खाजगी हवामान संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या मोसमी पावसाच्या (मान्सून) अहवालानुसार यंदाचा मान्सून हा सरासरीहून कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मान्सून बाबत खाजगी हवामान संस्था ”स्कायमेट” ने नुकताच आपला मान्सून अहवाल जाहीर केला आहे. यासाठी विविध हवामान स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. ”स्कायमेट” च्या अहवालानुसार यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच ”एल निनो” सक्रीय होण्याची शक्यता असून तो शरद ऋतूत अधिक तीव्र होऊ शकतो असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा प्रभाव मान्सूनवर पडणार असून त्यामुळे मान्सूनचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण कसे ठरते?
”एल निनो” सह इंडियन ओशन डिपोल (आयओडी) म्हणजेच हिंदी महासागराच्या तापमानाच्या फरकाचा परिणामही मान्सूनवर होत असतो. या हंगामात सकारात्मक आयओडी निर्माण झाल्यास तो एल निनोच्या नकारात्मक परिणामांना काही प्रमाणात कमी करू शकतो. आयओडी सकारात्मक स्थितीत असेल तर सुरुवातीला मान्सूनला अनुकूल स्थिती असेल हंगामाच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या शक्यतांमुळे भारताच्या विविध प्रांतात पावसाचे प्रमाण भिन्न असेल असा अंदाज आहे. मध्य आणि पश्चिम भारतातील हवामानाचा प्रभाव असणाऱ्या भागांमध्ये कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये, विशेषत: ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागात तुलनेने चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
स्कायमेटचा अंदाज काय?
यंदा सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता सर्वात अधिक म्हणजे ४० टक्के आहे, तर यंदा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता ३० टक्के आहे.
कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल?
जून महिन्यात साधारण सरासरीइतकाच (किंवा थोडा जास्त) पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. जुलै महिन्यात सरासरी इतका किंवा त्याहूनही कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी (६०%) असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर सप्टेंबरमध्ये सरासरी पावसाहून कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे यंदा पावसाची सुरुवात अनुकूल होणार असली तरीही त्यानंतर पाऊस अनियमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
