scorecardresearch

नालेसफाई धिम्या गतीने; पावसाळापूर्व कामांपैकी ४५ टक्के गाळ साफ

नालेसफाईच्या कामांना यंदा उशीर झाला असून दोन पाळय़ांमध्ये नालेसफाईचे काम सुरू असतानाही अद्याप ५० टक्के गाळही काढून झालेला नाही.

मुंबई: नालेसफाईच्या कामांना यंदा उशीर झाला असून दोन पाळय़ांमध्ये नालेसफाईचे काम सुरू असतानाही अद्याप ५० टक्के गाळही काढून झालेला नाही. पावसाळय़ापूर्वी ७५ टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट असले तरी अद्याप ७५ टक्क्यांपैकी केवळ ४५ टक्केच गाळ म्हणजे एकूण गाळाच्या ३० टक्के गाळ काढला असल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळय़ाआधी काढला जातो. दरवर्षी १ एप्रिलपासून हे काम सुरू होते. यंदा मात्र पालिकेची मुदत संपत असताना स्थायी समितीने नालेसफाईचे प्रस्तावच मंजूर केले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने नंतर आपल्या अधिकारात नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आणि ११ एप्रिलपासून प्रत्यक्षात नालेसफाईची कामे सुरू झाली. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. मात्र ७५ टक्के गाळ काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी १५ मे पर्यंतची मुदत दिली होती. दोन पाळय़ांमध्ये व अतिरिक्त सामग्री लावून ही कामे पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र सध्या तरी केवळ ३० टक्केच गाळ काढण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आल्याची कबुली पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. म्हणजेच पावसाळापूर्व गाळ काढण्याचे उद्दिष्ट ४५ टक्के पूर्ण झाले आहे.

मुंबईत एकूण ३४० किलोमीटर लांबीच्या मोठय़ा व छोटय़ा नाल्यांची आणि नद्यांची पावसाळापूर्व साफसफाई केली जाते. यंदा नालेसफाईच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी; अशा दोन्ही वेळी गाळाचे वजन करण्यासह दोन्ही वेळी व्हिडीओ छायाचित्रणही करण्यात येत आहेत.

मुंबईत सध्या दररोज साधारण ११ हजार टन काढला जातो, मात्र गाळ वाहून नेण्यासाठी मोठय़ा गाडय़ांना ठरावीक वेळातच परवानगी दिली जाते. त्यामुळे आता तीन पाळय़ांमध्ये काम सुरू करण्यात येणार असून गाळ वाहून नेण्याचे काम तिसऱ्या पाळीत करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर यांनी दिली. यंदा कामे उशिरा सुरू झाल्यामुळे कंत्राटदारांना दोन टप्प्यांत कंत्राटे देण्यात आली होती. त्यात आधी ५० टक्के कामाचे कंत्राट देण्यात आले होते व ते पूर्ण केल्यानंतर पुढील ५० टक्क्यांचे काम देण्याचे आले होते, असे आचरेकर यांनी सांगितल़े

‘पाणी तुंबणारच’

मुंबईत दरवर्षी तब्बल दोन हजार ते अडीच हजार मिमी पाऊस पडतो. मात्र त्यापैकी ३० ते ३५ टक्के पाऊस हा दोन ते तीन दिवसांत पडतो. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही, अशी खात्री देता येणार नाही, असे मत उपआयुक्त उल्हास महाले यांनी व्यक्त केले. मात्र ३१ मे पर्यंत गाळ काढण्याचे उद्दिष्ट आम्ही नक्की पूर्ण करू. गाळ काढल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची नाल्यांची क्षमता वाढेल, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Slow pre monsoon works non cleansing work before the rains ysh

ताज्या बातम्या