मुंबई : चेंबूरमधील चरई नाल्याची १५ दिवसांपूर्वी पालिकेने सफाई केली आहे. मात्र सफाईदरम्यान उपसलेला गाळ १५ दिवसांनंतर नाल्यातच एका बाजूला जमा करून ठेवण्यात आला आहे. परिणामी, पाऊस पडताच हा गाळ पुन्हा नाल्यात पसरून पाणी साचण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, तत्काळ नाल्यातून गाळ बाहेर काढावा आणि त्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पालिकेने नालेसफाईची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. काही ठिकाणी नालेसफाई पूर्ण झाली आहे. मात्र काही नाल्यांमध्ये एका बाजूला गाळ जमा करून ठेवण्यात आला आहे. साधारण १५ दिवस उलटल्यानंतरही गाळ नाल्यातच आहे. पालिकेच्या ‘एम-पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील चेंबूर चरई नाल्याची अशीच अवस्था आहे. चेंबूर पोलीस ठाण्यापासून या नाल्याची सुरुवात होऊन तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाजवळ संपतो. पालिकेने १५ दिवसांपूर्वी या नाल्याची पूर्णपणे सफाई केली. मात्र सफाईनंतर नाल्यातून उपसलेला गाळ बाहेर न काढताच तो नाल्यामध्येच जमा करून ठेवला आहे. या नाल्याचे बांधकाम संथगतीने सुरू असून त्यामुळे सांडपाण्याला मोठा अडथळा निर्माण होत आहे. गेली तीन वर्षे या परिसरात पावसाळय़ात पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे असताना पालिकेने नाल्यातून काढलेला गाळ नाल्यातच जमा करून ठेवल्याने सांडपाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्यास हा गाळ पुन्हा नाल्यातच वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ नाल्यातून गाळ बाहेर काढावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.