घाटकोपरमध्ये भूमाफियांकडून तिवरांची कत्तल

एकीकडे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी  झाडे लावण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे घाटकोपरमधील कामराजनगर परिसरात पोलीस अणि पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तिवरांचे जंगल संपवण्याचे सत्र सुरु आहे. तिवरांची कत्तल करून त्या जागी भूमाफियांकडून झोपडय़ा उभारल्या जात असून याची तक्रार करणारया नागरिकांना धमक्या दिल्या जात आहेत.

गेली अनेक वर्षे घाटकोपरमधील कामराजनगर परिसरातील कोकणवैभव चाळी लगत असलेल्या खाडीच्या जागेवर भूमाफियांकडून तिवरांची राजरोस कत्तल सुरू आहे. त्यानंतर या झाडांवरच मोठय़ा प्रमाणात भरणी टाकून ती जागा अडविण्यात येते. काही दिवसांतच पत्र्याच्या झोपडय़ा व कालांतराने याठिकाणी पक्की घरी उभारली जातात. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे माफिया झोपडय़ांचे खोटी कागदपत्रे तयार करून याच झोपडय़ा चार ते पाच लाखात विकत आहेत. अशाप्रकारे या ठिकाणी गेल्या काही वर्षांत बेसुमार बेकायदा झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत.

याबाबत काही रहिवाशांनी अनेकदा जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिकेला तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून काहीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस याठिकाणी या झोपडय़ा वाढतच आहेत. याशिवाय तक्रारी करणाऱ्या रहिवाशांना खोटय़ा गुन्ह्य़ात वा ठार मारण्याची धमकी माफियांकडून मिळत आहे. काही भूमाफियांनी तर धर्माच्या नावाने याठिकाणी झेंडे लावत ही जागा अडवली आहे. त्यानंतर काही दिवसांतच एका रात्रीत याठिकाणी झोपडय़ा उभारल्या आहेत. पालिकेच्या ‘एन’ वार्डात अनेक तक्रारी गेल्यानंतर येथील अधिकाऱ्यांनी याठिकाणी अनेकदा याठिकाणी कारवाई केली, मात्र तरीही झोपडय़ा उभ्या राहतच असल्याने पालिकेने सात ते आठ जणांची नावाने पंतनगर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे, मात्र दोन ते तीन महिने उलटून देखील पंतनगर पोलिसांनी यातील एकाही आरोपीवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे या माफियांवर लवकरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.