मुंबई : उद्योग सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घ्यावी लागणारी पर्यावरणीय संमती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. अधिसूचित औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक क्षेत्रांमध्ये असलेल्या सूक्ष्म आणि लघुउद्योगांना स्वप्रमाणित अर्ज सादर केल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक संमती मिळाली असे गृहीत धरण्यात येणार आहे. जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण नियंत्रण कायद्यांनुसार आवश्यक संमती तसेच विविध प्रकारच्या कचरा व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्योगांना पर्यावरणीय संमती मिळविताना लागणारा वेळ आणि प्रशासकीय प्रक्रिया कमी करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. संमतीची प्रक्रिया सुलभ केली असली तरी प्रदूषण नियंत्रणाच्या अटी, पर्यावरणीय नियम आणि संबंधित कायद्यांचे पालन करण्याची जबाबदारी उद्योगांवर कायम राहणार आहे. केंद्र सरकारच्या २०२३च्या जनविश्वास कायद्यानंतर जल व वायुप्रदूषण नियंत्रण कायद्यांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतर केंद्राने संमती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. २०२६ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचविलेल्या बदलांचा विचार करून आता सुधारित तरतुदी करण्यात आल्या आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी संमती शुल्क ठरविताना सांडपाण्याचे प्रमाण हा प्रमुख निकष करण्यात आला आहे. दहा हजार लिटरपर्यंत सांडपाणी निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना वार्षिक पाच हजार रुपये, इतर प्रकल्पांना ७५०० रुपये शुल्क आकारले जाईल. दहा ते ५० हजार लिटर सांडपाण्यासाठी अनुक्रमे १५ हजार आणि २२,५०० रुपये शुल्क राहील. पाच लाख ते दहा लाख लिटर सांडपाण्यासाठी अनुक्रमे ६५ हजार आणि ९७,५०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. दररोज २५ लाख लिटरपेक्षा अधिक सांडपाणी निर्माण करणाऱ्या प्रकल्पांसाठी गृहनिर्माण प्रकल्पांना चार लाख, तर इतर प्रकल्पांना सहा लाख रुपये वार्षिक शुल्क राहील.

केवळ डिझेलवर चालणारे विद्युत जनित्र हा ऊर्जेचा स्रोत असलेल्या आस्थापनांसाठीही स्वतंत्र शुल्करचना करण्यात आली आहे. २५० किलोवॅटपर्यंतच्या जनित्रासाठी कोणतेही वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही. २५० ते ५०० किलोवॅट क्षमतेसाठी एक हजार, ५०० किलोवॅट ते एक मेगावॅटसाठी दोन हजार, तर एक मेगावॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी पाच हजार रुपये वार्षिक शुल्क राहील. राज्य, केंद्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या आणि त्यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या आरोग्य संस्थांना संमती शुल्कातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था तसेच जैववैद्यकीय कचरा निर्माण करणाऱ्या उद्योगांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या आधारे एकत्रित संमती व परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.