मुंबई : इगतपुरी येथील ‘एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठांची संख्या दहावर पोहोचली आहे. त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून काही अभ्यासक्रमांसंदर्भात करण्यात येणार आहे.

एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरला मिळालेल्या अभिमत दर्जाची अंमलबजावणी तातडीने होणार नसली तरी काही ठरावीक अभ्यासक्रमांसाठी हा दर्जा लागू होणार आहे. यामध्ये फिजिओथेरपीमधील बीपीटी, आयुर्वेदातील बीएएमएस आणि एमडी-एमएस, फार्मसीमधील बी.फार्म आणि एम.फार्म, तसेच एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमधील एमडी-एमएस आणि डीएम-एम.सीएच. या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला नव्या अभिमत विद्यापीठाच्या दर्जानुसार प्रवेश दिला जाणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पात्रता, नोंदणी, समुपदेशन, शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांवर निर्णयाचा परिणाम नाही

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा तातडीने परिणाम होणार नाही. त्यांचे अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राहणार आहेत. महाराष्ट्रात यापूर्वी भारती विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटी, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे.