मुंबई : संपामुळे राज्यातील पाच महिन्यांपासून ठप्प असलेली एसटीची सेवा आता सुरळीत होणार आहे.  एकूण ९१ हजार २६६ पैकी ८२ हजार ३६० कर्मचारी कामावर परतल्याची  माहिती एसटी महामंडळाने दिली. शुक्रवारी ५ हजार ३९८ कर्मचारी कामावर हजर झाले. कामावर रुजू झालेल्यांमध्ये १० हजार बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी असून त्यांना रुजू करून घेण्याची सर्व प्रक्रिया हळूहळू पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात एसटी कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढेल आणि एसटी सोमवारपासून पूर्ण क्षमतेने धावेल, अशी माहिती महामंडळाने दिली.

एसटीत संपाआधी ९२ हजार २६६ कर्मचारी होते. संपकाळात एक हजार कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची घटली. हे सर्व कर्मचारी संपात सामील झाले होते. संपामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल झाले. तर परीक्षाकाळात विद्यार्थ्यांनाही पायपीट करावी लागली. याचा गैरफायदा घेऊन खासगी प्रवासी वाहतुकदारांनी प्रवाशांची लूट चालवली. कारवाया मागे घेण्याचे आश्वासन आणि कर्मचाऱ्यांना परतण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक कर्मचारी हळूहळू परतू लागले. यात प्रथम प्रशासकीय व यांत्रिकी कर्मचारीच आघाडीवर होते. चालक, वाहक रुजू होत नव्हते. मात्र ७ एप्रिलला न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले तर कामावर हजर न झाल्यास त्यानंतर कारवाई केली जाईल, असे महामंडळाने परिपत्रक काढून स्पष्ट केले. त्यानंतर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली.

सद्य:स्थिती..

गुरुवारी २ हजार ९९२ कर्मचारी कामावर परतल्याने एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ७६ हजार ९६२ झाली होती. तीस हजारहून अधिक फेऱ्या झाल्या. त्यातून १९ लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे ११ कोटी ४४ लाख रुपये उत्पन्न मिळाले. शुक्रवारी ५ हजार ३९८ कर्मचारी कामावर आले. त्यामुळे हजर कर्मचाऱ्यांची एकूण संख्याही ८२ हजार ३६० झाली.

बडतर्फ कर्मचारी परतण्यास सुरुवात

एसटीचे १० हजार ३०८ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. यातील ९ हजार ५७७ जणांनी अपील केले असून ४ हजार ७०० कर्मचाऱ्यांचे अर्ज निकाली काढले आहेत. यातील काही कर्मचारी हजर होत असून काहींचे वैद्यकीय चाचणी व अन्य प्रक्रिया शिल्लक आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढेल आणि एसटीची सेवा पूर्णपणे सुरळीत होईल, अशी आशा एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

२८ एप्रिलपर्यंत मुदत

जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत आणि त्यांनी प्रथम अपील केले आहे, त्या आदेशापासून चार आठवडय़ांच्या आत ताकिद देऊन निकाली काढण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी प्रथम अपील केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांना तीन आठवडय़ाची मुदतही देण्यात आली आल्याचे महामंडळाने ८ एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकातच नमूद करण्यात आले होते. त्यानुसार २८ एप्रिलपर्यंत मुदत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. बडतर्फ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत अपील न केल्यास त्यांना एसटी सेवेत स्वारस्य नसल्याचे समजण्यात येणार आहे.

सदावर्तेसह ११५ आंदोलकांना जामीन

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी वकील गुणरतन सदावर्ते आणि ११५ एसटी कर्मचाऱ्यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी अखेर जामीन मंजूर केला. सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला असला तरी ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांची सुटका होणार नाही.