Mumbai High Court / मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छाल यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पलाश याच्याबाबतच्या कथित बदनामीकारक विधानाची उच्च न्यायालयाने दखल घेतली. तसेच, स्मृतीचा बालमित्र असल्याचा दावा करणारा निर्माता अभिनेता विज्ञान माने याला पलाशविरुद्ध कोणतीही बदनामीकारक टिप्पणी करण्यास तूर्त मज्जाव केला.

स्मृती आणि पलाशचे लग्न व्यभिचाराच्या कारणास्तव मोडल्याचा दावे करण्यात आल्यानंतर विज्ञान याने अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीत पलाशविरुद्ध बदनामीकारक भाष्य केले होते. पलाशने विज्ञानविरोधात पलाश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, व्यावसायिक वादातून विज्ञान याने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक विधाने केल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे, त्याबद्दल नुकसानभरपाई आणि आक्षेपार्ह विधाने करण्यापासून कायमस्वरूपी मनाई आदेश देण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने या मजकूराची गंभीर दखल घेतली. तसेच, विज्ञान याने केलेल्या टिप्पण्या सकृतदर्शनी बदनामीकारक असल्याचे नमूद करून पलाशला अंतरिम दिलासा दिला. अशा टिप्पण्या सार्वजनिकरित्या प्रसारित केल्या गेल्या तर त्या एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते, अशी टिप्पणीही न्यायालयाने पलाशला पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा देताना केली.

न्यायालयाने आपल्या आदेशात पलाश याच्या प्रतिष्ठेला पोहोचणारी हानी रोखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचप्रमाणे विज्ञान याला या प्रकरणी पुढील कार्यवाही होईपर्यंत पलाशबाबत कोणतेही आक्षेपार्ह किंवा बदनामीकारक विधान करणे तात्काळ बंद करावे, असे आदेश दिले.

स्मृती आणि पलाश यांचे लग्न रद्द केल्याबद्दल विज्ञान याने काही स्फोटक आरोप केले होते. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. विज्ञान याने केलेल्या आरोपांनुसार, तो पलाश आणि समृती यांच्या लग्नाच्या सर्व विधींना उपस्थित होता आणि लग्नाच्या एक दिवस आधी पलाश दुसऱ्या महिलेसोबत पकडला गेला. त्यावेळी समारंभाला उपस्थित भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पलाशला मारहाण केली, असा दावाही विज्ञान याने समाजमाध्यवरून केला होता.

पलाशने त्याचीही ४० लाख रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा दावा विज्ञान याने केला होता. तसेच, या प्रकरणी त्याने सांगली पोलिसांत तक्रार नोंदवल्याचे म्हटले होते. आपल्याकडे या सगळ्याचे पुरावे असल्याचा दावा देखील विद्यान याने केला होता.

दरम्यान, या आरोपांना उत्तर देताना, पलाश याने इन्स्टाग्रामवर एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात त्याने, आरोपांचे खंडन केले होते. माझी प्रतिष्ठा खराब करण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने हे केले गेले आहे आणि त्यांना असेच सोडू शकत नाही, असेही पलाश याने निवेदनात म्हटले होते.