५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप | Smuggling of iPhone worth Rs 500 crore amy 95 | Loksatta

५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप

वर्षभरात सुमारे ५०० कोटी रुपये किमतीच्या आयफोनची तस्करी केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) शुक्रवारी अटक केली.

५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
(संग्रहित छायचित्र)

मुंबई : वर्षभरात सुमारे ५०० कोटी रुपये किमतीच्या आयफोनची तस्करी केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) शुक्रवारी अटक केली. आरोपी सराईत असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळातील एअर कार्गो संकुल येथे गेल्या वर्षी डीआरआयने केलेल्या कारवाईत तीन हजार ६०० आयफोन जप्त केले होते. मेमरी कार्ड जाहीर करून त्याच्या आडून हे महागडे फोन हाँगकाँग येथून भारतात आणण्यात आले होते. आरोपीने आयफोन तस्करीच्या माध्यमातून २०० कोटी रुपये सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप आहे.

दिनेश सालेचा असे अटक आरोपीचे नाव असून तो मुंबईतील ताडदेव परिसरातील रहिवासी आहे. संगणकाचे सुट्टे भाग व मेमरी कार्ड जाहीर करून आरोपी व त्याच्या टोळीने गेल्या वर्षी ५०० कोटी रुपयांच्या आयफोनची तस्करी केल्याचा आरोप आहे.सालेचा याला न्यायालयात हजर करण्यात आले असता बचाव पक्षाने ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. केंद्र शासनाच्या वतीने (डीआरआय) विशेष सरकारी वकील अॅड. अमित मुंडे यांनी आरोप फेटाळून लावत डीआरआयला समन्स पाठवून चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराअंतर्गत समन्स पाठवून आरोपीला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 05:40 IST
Next Story
मुंबई: विकासकामे रोखणे तथ्यहीन ; उच्च न्यायालयाची टिप्पणी, राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती