मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीच्या महिला डब्यात साप दिसल्याच्या अफवेने शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली-सीएसएमटी धीमी लोकल तब्बल चार वेळा थांबविण्यात आली. महिला प्रवाशांनी ठाणे स्थानकात आपत्कालीन साखळी ओढल्याने लोकल १२ मिनिटे खोळंबली. त्यानंतर मुलुंड, नाहूर आणि कुर्ला येथेही खबरदारी म्हणून लोकल थांबवून तपासणी करण्यात आली. मात्र, सर्पमित्रांनी केलेल्या सखोल तपासणीत साप आढळला नाही. या घटनेमुळे अप धीम्या मार्गावरील सुमारे १५ ते २० लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आणि सकाळी गर्दीच्या वेळी हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला.
सकाळी ८.४१ वाजता डोंबिवलीहून सीएसएमटीकडे निघालेली धीमी लोकल ९.१४ वाजता ठाणे स्थानकात पोहचली. यावेळी महिला डब्यात साप असल्याची अफवा पसरताच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि आपत्कालीन साखळी ओढली. त्यामुळे लोकल सकाळी ९.१४ ते ९.२६ या कालावधीत ठाण्यातच थांबली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी द्वितीय श्रेणी महिला डब्याची तपासणी केली. मात्र त्यांना साप आढळला नाही. त्यानंतर लोकल पुढे रवाना झाली. मात्र, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने मुलुंड येथे सकाळी ९.३१ ते सकाळी ९.३३ आणि नाहूर येथे सकाळी ९.३६ ते सकाळी ९.४० या वेळेत पुन्हा लोकल थांबवून पाहणी करण्यात आली.
सकाळी १०.०७ वाजता लोकल कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक २ वर आणण्यात आली. येथे महिला डब्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आसनाखाली आणि डब्याच्या सर्व भागांची तपासणी केली. मात्र, साप आढळला नाही.
तपासणीनंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महिला प्रवाशांना दुसऱ्या डब्यातून प्रवास करण्याचे आवाहन केले. काही महिलांनी मात्र त्याच डब्यातून प्रवास करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दोन महिला आरपीएफ जवानांची त्या डब्यात नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लोकल सीएसएमटीच्या दिशेने रवाना करण्यात आली.
या संपूर्ण प्रकारामुळे मागून येणाऱ्या लोकलवर परिणाम झाला. सकाळी गर्दीच्या वेळी ठाणे, मुलुंड, नाहूर आणि पुढील स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. अनेकांना नियोजित लोकल सोडून पुढील लोकलची प्रतीक्षा करावी लागली. परिणामी, अप धीम्या मार्गावरील सुमारे २० लोकल विलंबाने धावल्या आणि अनेक नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला.
