मुंबई : विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमता (एआय) क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी महिला विद्यापीठ) जुहू संकुलातील उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘एस. ए. पी सेंटर ऑफ एक्सलन्स – एआय करिअर्स फॉर वूमेन’ हे केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एआय क्षेत्रात नवी दारे खुली होणार आहे.

महिलांना तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास, दर्जेदार प्रशिक्षण आणि उद्योग सहभाग यावर ‘एआय करिअर्स फॉर वूमेन’ या केंद्रामध्ये भर दिला जाणार आहे. या नव्या केंद्रामुळे विद्यार्थिनींना एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रामुळे विद्यार्थिनींना जागतिक दर्जाचे शिक्षण व संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी यावेळी दिली. हे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर यांनी सातत्याने मार्गदर्शन व प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

एआय क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी व त्याचे महत्त्व सागरिका बोस यांनी उपस्थितांसमोर मांडले. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण मिळून करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील, असे सांगताना बोस यांनी विद्यार्थिनींना भविष्यातील गरज ओळखण्याचा सल्ला दिला. एआयमधील प्रशिक्षणामुळे देश-विदेशामधील नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एआयसंदर्भात विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तरपणे उत्तर देत बोस यांनी त्यांच्या शंकाचे समाधान केले.

कार्यक्रमाला सॅप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालकांचे चीफ ऑफ स्टाफ विनीत राजन, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, आशिष अरोरा, मरियम साजीद, निकिता नाडकर्णी, नावेद शेख, आदित्य कर्डक यांच्यासह प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल बिंदू यांनी केले, तर प्रा. विलास खरात यांनी आभार प्रदर्शन केले.