“ …तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो ” ; उद्धव ठाकरेंचं विधान!

“ज्यांना अजुनही वाटतं ते मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात…” असं म्हणत फडणवीसांवर देखील साधला निशाणा

“कदाचित जर का दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता. तर मी कदाचित हा शब्द वापरतोय, मी या राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो. कारण, हे क्षेत्र माझं नाही जी माझ्यावर टीका होते. हो हे क्षेत्र माझं नाही. मी एक पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलो आणि पाय रोवून ठामपणे उभा राहिलेलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे. ती ठामपणे पार पाडल्याशिवाय मी राहणार नाही. या एका निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे.” असं विधान शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना केलं.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “हिंमत असेल तर अंगावर या, आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावरती. काय आहे तसं लायकी तरी आहे का? पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांना आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे हे विसरू नका. अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल. स्वतःमध्ये हिंमत आणि धमक असेल तर आव्हान द्या.. ईडी, सीबीआय, आयटी यांच्या माध्यमातून देऊ नका. मी देखील आज पक्षप्रमुख म्हणून आव्हान द्यायचं झालं. तर या शिवसैनिकांच्या माध्यमातून त्यांच्या ताकदीवरून देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. नाहीतर आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामर्द म्हणातात. हे मर्दाचं लक्षण नाही हिंदुत्वाचं तर नाहीच नाही, अजिबात नाही.”

तसेच “आज दोन मेळावे असतात, एक आपला आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. आपले विचार एक आहे धारा वेगळ्या असू शकतील. पण विचार एक होते आहेत, म्हणून आणि म्हणूनच आम्ही केवळ आणि केवळच हिंदुत्व म्हणून भाजपाशी युती केली होती. ज्यांना अजुनही वाटतं ते मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात, जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज ना उद्या तुम्ही देखील पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात. पण तुमच्या नशीबात नव्हतं. म्हणून तुम्ही वचन मोडलं. मी हे पद स्वीकारलं एका जबाबदारीने स्वीकारलं. केवळ आणि केवळ मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन.. तसं म्हटलं तर ते वचन अजुनही पूर्ण झालेलं नाही. मी देखील त्यांना सांगितलेलं आहे. मी त्यांचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवीन आणि तो मी दाखवीनच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित जर का दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता. तर मी कदाचित हा शब्द वापरतोय मी या राजकीय जीवनातून बाजूला देखील झालो असतो. कारण, हे क्षेत्र माझं नाही जी माझ्यावर टीका होते, हो हे क्षेत्र माझं नाही. मी एक पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलो आणि पाय रोवून ठामपणे उभा राहिलेलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे. ती ठामपणे पार पाडल्याशिवाय मी राहणार नाही. या एका निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे.” असंही उद्धव ठाकरेंना यावेळी बोलून दाखवलं.

“ तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे ” ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा!

याचबरोबर, “हे काही थोतांड नाही. की मै तो फकीर हू.. मेरी झोली… हे झोली वैगेर आमचे दरिद्री विचार नाहीत. पण जे दोन मेळावे मी म्हटले त्यातला आज सकाळी आरएसएसचा मेळावा झालेला आहे आणि आता आपला मेळावा होतोय. हिंदुत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदुत्व म्हणजे काय? मला मोहन भागवत यांना सांगायचं आहे की माफ करा मी जे काय बोलणार आहे, ते तुमच्यावर टीका करतोय असं समजू नका. पण तुम्ही जे काय सांगत आहात आणि मी जे काय सांगतोय, ते जर का आपलीच माणसं ऐकणार नसतील. तर मग हे मेळावे करायचे कशासाठी? मागील वर्षी देखील जे मोहन भागवत यांन सांगितलं होतं. हिंदुत्व म्हणजे काय? मी त्यांची वाक्य आणलेली आहेत. पण एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

“शिवसेना प्रमुखांनी अनेकदा सांगितलेलं आहे, की पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. जात,पात, धर्म हे नंतर आपल्याला चिकटतो. मग काय करायचं आहे त्या धर्माचा अभिमान असायला पाहिजे. धर्म पाळायचा पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा आणि घराबाहेर मी जेव्हा पाऊल टाकतो. हा माझा देश हाच माझा धर्म असलाच पाहिजे. हे आमचं हिंदुत्व आहे. पण हा विचार आमचा आहे ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही घराबाहेर पडतो आणि देश हा माझा धर्म म्हणून जेव्हा आम्ही वाटचाल करत असतो. त्यावेळी जर का आमच्या वाटेमध्ये स्वतःच्या धर्माची मस्ती घेऊन मध्ये कोणी अडथळा आणला, तर मग मात्र आम्ही कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही देखील आमची पुढची शिकवण आहे. ” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

विजयादशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र,उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: So maybe i would have stepped aside from political life uddhav thackerays statement msr