ज्यांना जन्म दिला त्यांच्यापायीच जगणे कष्टाचे!

हेल्पेज इंडियाने देशातील प्रमुख २३ शहरांमधील ६० ते ६९ वयोगटातील ५०,०१४ वृद्धांशी संवाद साधला.

प्रतिनिधिक छायाचित्र

कायद्याचे संरक्षण असूनही ज्येष्ठ नागरिक हतबल

संदीप आचार्य/  निशांत सरवणकर, मुंबई : आता म्हातारपणी घर तुमच्या नावावर ठेवून काय करणार, तत्काळ आमच्या नावावर करा, असा मुलाकडून घरासाठी होणारा तगादा सत्तरीचे माधवराव अस्वस्थपणे सहन करत होते. घर नावावर व्हावे म्हणून सूनही आदळआपट करीत होती. दुसऱ्या एका प्रकरणात आजारी वडिलांच्या उपचारासाठी मुलाला वेळ मिळत नव्हता. परंतु दाद मागायची तरी कोठे म्हणून ते गप्प बसून राहिले. हे केवळ मुंबईतलेच नव्हे, तर देशभरातील चित्र आहे. मुलांनी घरातील वृद्धांचे संगोपन करण्यासंदर्भातील कायदा कागदावर असूनही  ७० टक्के वृद्ध मंडळी मुले व सुनांकडून होणारी छळवणूक सहन करत हतबलतेने जगत आहेत.काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये वडील घर नावावर करीत नाहीत म्हणून मुलाने आई-वडिलांवर विषप्रयोग केला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये घरातील वृद्ध लोकांना प्रेमाने सांभाळण्याऐवजी, पती-पत्नी आणि मुले असे चौकोनी आयुष्य जगण्याचे प्रमाण वाढत आहे. बहुतेक घरात आई-वडील ही अडगळ ठरत असून यातूनच घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष, त्यांची छळवणूक, त्यांना अपमानास्पद बोलणे याचे प्रमाण वाढत आहे.

वृद्धांना आधार देणारा कायदा २००७ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यातंर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाल्यांकडून निर्वाहखर्च देण्याची तरतूद आहे. प्रत्येक जिल्ह्यतील उपविभागासाठी न्यायाधिकरण स्थापण्यात आले आहे. पालकांचा सांभाळ न केल्यास तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही कायद्यात आहे. असे असूनही मुले अथवा सुनांकडून होणारा अपमान आणि छळ ७०टक्के वृद्ध सहन करीत जगत असल्याचे ’हेल्पेज इंडिया २०१८’च्या अहवालात नमूद आहे.

हेल्पेज इंडियाने देशातील प्रमुख २३ शहरांमधील ६० ते ६९ वयोगटातील ५०,०१४ वृद्धांशी संवाद साधला. यात केवळ १८ टक्के वृद्धांनी आपल्या छळवणुकीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवल्याचे दिसून आले. त्यापैकी केवळ ३५ टक्के प्रकरणात पोलिसांकडून न्याय मिळाला असून बऱ्याच प्रकरणात तडजोड होते अथवा वृद्धमंडळी तक्रार मागे घेत असल्याचे दिसून आले.

मुंबईसारख्या शहरात जागेच्या मुद्दय़ावर आई-वडिलांना मोठय़ा प्रमाणात मुलांशी सामना करावा लागत असून मुंबई पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर बहुतेक प्रकरणात मुलांना बोलावून समज देऊन वद्धांची काळजी घेण्याकडे पोलिसांचा कल दिसून येतो. कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी समजुतीने प्रकरण मिटवून वृद्धांची काळजी घेण्याचा सल्ला पोलीस देत असले तरी अनेक प्रकरणात वृद्धांना वृद्धाश्रमात दाखल करण्यापासून ते एकाकी वृद्धांना घरी जाऊन जेवण देण्यापर्यंत पोलिसांनी मदत केली आहे.

 

मुंबई पोलिसांच्या १०९० या वृद्धांसाठीच्या हेल्पलाइनवर आठवडय़ाला सुमारे ४० दूरध्वनी येतात. याशिवाय १०० क्रमांकावरही अनेकदा वृद्ध मंडळी दूरध्वनी करतात. यातील प्रत्येक दूरध्वनीची नोंद ठेवण्यात येत असून वृद्धांच्या तक्रार निवारणानंतरही संबधित पोलीस ठाणे संबंधित तक्रारदार वृद्धाची घरी योग्य काळजी घेतली जात आहे अथवा नाही, याचा पाठपुरावा करत असते. प्रत्येक पोलीस ठाण्यात एकाकी वृद्धांचीही नोंद असून त्यांना आवश्यक मदत संबंधित पोलीस ठाण्याकडून करण्यात येते. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींपैकी ७० टक्के तक्रारी खऱ्या असून १० टक्के प्रकरणात जेवण अथवा वैद्यकीय उपचारांची आबाळ होत असल्याच्या तक्रारी असतात.

– दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Social issues of senior citizens problem that senior citizens face