मुंबई : देशात सध्या काहींच्याच हाती संपत्ती केंद्रित झाल्याचे, तर दुसरीकडे बहुसंख्य जनता दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असल्याचे चित्र आहे, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी अधोरेखित केले. तसेच, सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली नाही, तर देशातील व्यवस्था पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल, असा इशाराही दिला.
राज्यघटनेच्या मूलभूत मूल्यांचे महत्त्व पटवून देताना राजकीय लोकशाही ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीशिवाय अपुरी असल्याचेही सरन्यायाधीशांनी यावेळी प्रामुख्याने नमूद केले. नरिमन पॉइंट येथील एनसीपीए येथे अॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे (आवि) आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करताना सरन्यायाधीशांनी हे विधान केले. राज्यघटना हीच सर्वोच्च आहे आणि समानतेशिवाय स्वातंत्र्य अराजकतेकडे घेऊन जाते आणि स्वातंत्र्याशिवाय समानता वैयक्तिक पुढाकाराला अडथळा आणते. तथापि, दोन्हीना एकत्र ठेवण्यासाठी आणि समाज एकसंध राहावा यासाठी बंधुत्वाचे तत्त्व महत्त्वाचे असल्याचेही गवई म्हणाले.
दरम्यान, आविला १६१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघटनेतर्फे तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे सरन्यायाधीशांच्या हस्ते प्रकाशन झाले, याशिवाय, ११ लाख रुपयांचा निधी सशस्त्र दलाला देण्यात आला.