मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर झालेल्या जी. टी. रुग्णालयात आता मोठ्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ४० वर्षीय रुग्णावर खुब्याच्या सांधा-बदलीची (पूर्णत: हिप रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया या रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. यामुळे जी.टी. रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जी. टी. रुग्णालयाच्या अस्थिव्यंगापचार विभागामध्ये काही दिवसांपूर्वी सोलापूरहून एक ४० वर्षीय व्यक्ती उपचारासाठी आली होती. दोन वर्षांपासून या व्यक्तीचा उजवा खुबा दुखत असल्याने तो लंगडत चालत होता. या त्रासामुळे त्याला दैनंदिन कामे करणे अवघड झाले होते. दोन वर्षांपासून त्रस्त असलेली ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी जी.टी. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली. या रुग्णाचे क्ष-किरण, एमआरआर अशा विविध तपासण्या केल्यानंतर त्याच्या उजव्या खुब्याला अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे हाडांना रक्तपुरवठा कमी होण्याचा आजार झाल्याचे निदान झाले.
अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसमुळे खुब्याच्या सांध्याला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी सांधा-बदलण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्राध्यापक डॉ. अमित सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सचिन चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. रुची कारभारी यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण सामान्य आणि वेदनारहित जीवन जगू शकेल, त्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती डॉ. सुपे यांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र देशमुख, उपअधिष्ठाता डॉ. तुषार पालवे, डॉ. मललानी यांनी विशेष सहकार्य केले.
अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय ?
दारूचे अतिसेवन, धूम्रपान आणि स्टिरॉइडचा अतिवापर यामुळे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामध्ये हाडांना कमी रक्तपुरवठा होतो. परिणामी, नवीन ऊती बनविण्यासाठी आवश्यक असलेला रक्तप्रवाहच उपलब्ध होत नाही. हाडांमध्ये नव्याने ऊती तयार होत नसल्याने ती ठिसूळ होतात. त्यामुळे या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या खुब्यात वेदना होतात. त्याला लंगडत चालावे लागते. खाली बसतानाही त्रास होतो.
