मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील वर्षा या शासकीय बंगल्यासमोर सोलापूर येथील रहिवासी बुधवारी आत्मदहनासाठी आला होता. पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात मलबारहिल पोलिसांनी व्यक्तीगत व इतरांची सुरक्षा धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत व्यक्तीचे समुपदेशन करून त्याला नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थाबाहेर सुरक्षा रक्षकांना बुधवारी एक संशयीत व्यक्ती दिला. त्याच्या हातात ज्वलनशील पदार्थ असल्याचे जाणवल्यानंतर सर्व सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. तपासणी केली असता त्याच्याकडे पेट्रोल व लाईटर असल्याचे निष्पन्न झाले. अजीत रामकृष्ण मैंदर्गी अशी त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. तो आत्मदहन करण्याच्या उद्देशाने तेथे आला होता. पण पोलिसांनी त्याला रोखले. याप्रकरणी पोलीस शिपाई अक्षय मोरे यांच्या तक्रारीवरून त्या व्यक्तीविरोधात मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वतःची व इतरांची सुरक्षा धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आम्ही भारतीय न्याय संहिता कलम १२५ व २२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीचा सोलापूर येथे पॅकिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्याने तेथे कर्ज घेतले होते. त्यावरून बँकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात त्याने हे कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

सोलापूर येथील चावडी पोलिसांनी अजित मैंदर्गी नावाचा व्यक्ती मलबारहिल परिसरात आत्मदहन करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. त्यामुळे मुंबई पोलीस चावडी पोलिसांच्या संपर्कात होते. तसेच अर्जदारावर सतत नजर ठेवण्यासाठी दोन शॅडो वॉचर्स नेमण्यात आलेले होते. त्यानंतर बुधवारी दुपारी ३:२० ते ३:४० या दरम्यान अजीत टॅक्सीने मलबार हिल परिसरात जात असताना दिसून आल्यावरून तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिले व तात्काळ ताब्यात घेतले. त्याला तेथून मलबार हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या झडतीत त्याच्या बॅगेत १०० मि.ली. पेट्रोल आणि एक लाईटर सापडले. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता आणि दक्षता दाखवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. दाखल गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.