scorecardresearch

कोयनेच्या पाण्यावर सौरऊर्जा

कोयना धरणातून जलविद्युतबरोबरच सुमारे ६०० मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठीही चाचपणी करण्यात येत आहे.

कोयनेच्या पाण्यावर सौरऊर्जा
कोयना धरण (संग्रहित छायाचित्र)

तरंगत्या प्रणालीद्वारे ६०० मेगावॉट निर्मितीची चाचपणी

कोयना धरणातून जलविद्युतबरोबरच सुमारे ६०० मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठीही चाचपणी करण्यात येत आहे. तरंगत्या सौर पॅनेलच्या आधारे ही वीजनिर्मिती केल्यास जलविद्युत व सौरऊर्जा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निर्माण करणारा हा देशातील एकमेव प्रकल्प ठरणार आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. जलविद्युत निर्मितीनंतर समुद्रात जाणारे धरणातील पाणी मुंबईसह अन्य भागाला देण्याबाबतही पावले टाकण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या सौर व जलविद्युतनिर्मिती वाढविण्यावर केंद्र व राज्य सरकारने भर दिला आहे. जलविद्युत व सौरऊर्जा असे एकत्रित मॉडेल तयार करण्याचा विचार असून त्याबाबत राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (एनएचपीसी) अभ्यास करीत आहे. कोयना प्रकल्पाची जलविद्युत निर्मितीची क्षमता १९६० मेगावॉट इतकी मोठी आहे. या प्रकल्पामध्ये तरंगते सौर पॅनेल बसविल्यास तब्बल ६०० मेगावॉट इतकी सौरऊर्जा निर्माण होऊ शकते, असा अंदाज आहे. जगातील काही देशांमध्ये अशा पद्धतीने तरंगत्या सौरप्रणाली बसविण्यात आल्या आहेत. त्याचा प्रयोग येथे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास सध्या सुरू असल्याचे संबंधितांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी प्रति मेगावॉट नऊ ते दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होऊ शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

धरणातील ६७ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी असून वीजनिर्मितीनंतर ते समुद्राला जाते. ते मुंबईसाठी आणण्याची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. पण मुंबईसह महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ते कोणत्या भागाला देता येईल, असा विचारही सुरू आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-06-2016 at 02:42 IST

संबंधित बातम्या