scorecardresearch

किरीट, नील सोमय्यांवर गुन्हा दाखल; ‘विक्रांत’साठी निधी जमा करून अपहार केल्याचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात गुरुवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात गुरुवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते. विक्रांत या युद्धनौकेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतची डागडुजी होत आहे, हे समजल्यावर माजी सैनिक भोसले यांची त्यासाठी वर्गणी देण्याची इच्छा झाली.

चर्चगेट येथे २०१३ मध्ये किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे कार्यकर्ते विक्रांत वाचवा असा संदेश छापलेले टी शर्ट परिधान करून युद्धनौका विक्रांत संग्रहालय असे लिहिलेल्या पेटय़ांमधून चर्चगेट स्थानकाबाहेर निधी गोळा करत होते. भोसले  यांनी त्या वेळी दोन हजार रुपये पेटीत जमा केले. पुढे  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकणार असल्याचे त्यांना समजले. जानेवारी २०१४ मध्ये  विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकण्यात आले. सर्व भाग अंदाजे ६० कोटी रुपयांना विकण्यात आले, तसेच ते सर्व भाग आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ऑनलाइन लिलावाद्वारे विकत घेतल्याची माहिती  भोसले यांना वर्तमानपत्राद्वारे समजली.

दरम्यान, धिरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. सोमय्या यांनी २०१३-१४ मध्ये विक्रांत या जहाजाच्या डागडुजीसाठी नागरिकांकडून जमा केलेला निधी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये धनादेश अथवा रोख स्वरूपात जमा करण्यात आला का, याबद्दल माहिती विचारली. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नाही, तसेच त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर राज्यपाल कार्यालयातून देण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार  भोसले ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार केली आहे. अंदाजे ५७ कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम सोमय्या यांनी निधी म्हणून जमा केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी सायंकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘विक्रांत’ आरोपांनंतर तपशील देण्याचे सोमय्यांनी टाळले

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून गेलेला निधी गेला कुठे, याबाबत अधिक तपशील देण्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टाळले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्याने १० वर्षांनी विक्रांत निधीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून राऊत यांनी पुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करावा, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

सोमय्या यांच्याविरुद्ध ट्राँबे पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हास्यास्पद असून कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत, असे नमूद करुन सोमय्या यांनी निधीसंदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक मतप्रदर्शन करणे टाळले. दरम्यान, सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या सुमारे २७ हजार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींबरोबर ईडी अधिकाऱ्यांची गुरुवारी भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरू कमोडिटीजच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे हा कारखाना ताब्यात घेतला असून तो शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Somaiya refrained vikrant allegations challenge proving guilt ysh