भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासानंतरही किरीट सोमय्यांकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर आता अनिल परब यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.

“मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही म्हणून मी कोर्टात न्याय मागितला आहे. मी न्यायाधिशांच कोणतंही काम हातात घेतलेलं नाही जे किरीट सोमय्या स्वतः घेतात आणि तेच निर्णय देतात. मी कोर्टाकडे दाद मागितली आहे. माझ्याविरोधात अन्याय झाला आहे म्हणून जिथे दाद मागायला हवी होती तिथे मी दाद मागितली आहे. त्यामुळे त्यांनी आता कोर्टात याचं उत्तर द्यावं,” असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यावरही गंभीर आरोप केल्याचे माध्यमांनी विचारल्यानंतर अनिल परब यांनी त्याबाबत भाष्य केलं आहे. “हे सगळे आरोप खोटे आहेत हे लवकरच सिद्ध होईल. त्यामुळे बेछूट आरोप करुन फक्त प्रतिमा मलिन करायची हे काम त्यांनी घेतलेलं आहे आणि ते करत आहेत. मला पूर्ण खात्री आहे की आमचं निर्दोशत्व यातून नक्की सिद्ध होईल,” असे अनिल परब म्हणाले.

भाजपाकडून मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी कट्टासारख्या उपक्रमांचा वापर करण्यात येत आहे. याबाबतही अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला निवडणूक जिंकण्यासाठी जे मार्ग अबलंबवायचे आहेत ती त्या पक्षाची मोकळीक असते. मुंबई महापालिका कित्येक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. आम्ही लोकांच्या समोर आमची कामे घेऊन जाऊ. लोकांचा विश्वास आहे महापालिका शिवसेनेच्या हातात सुरक्षित आहे,” असे अनिल परब म्हणाले.

दरम्यान, परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. नोटीसीत ७२ तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी माफी न मागितल्यामुळे आता अनिल परब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.