मुंबई : निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या जीवनपद्धतींचा शोध, विज्ञान व पारंपरिक ज्ञानाचा मिलाफ आणि पर्यावरण रक्षणाच्या नव्या शक्यतांचा वेध घेणारा ‘दि सोमैया सस्टेनेबल डायलॉग’ हा एकदिवसीय उपक्रम सोमैया विद्याविहार विद्यापीठात १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
‘मानव–प्राणी–निसर्ग संवाद’ ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना असून पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे. सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर अचिव्हिंग सस्टेनेबल क्लायमेट अॅक्शन, डेव्हलपमेंट अँड एंगेजमेंट’ आणि ‘सोमैया इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड कन्सल्टन्सी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.
गोंड समाजाच्या जीवनदृष्टीतून निसर्गाचे दर्शन
सकाळी १० वाजता उद्घाटन सत्रात ‘चोला माटी : परधान गोंड विधी’ या विशेष परिसंवादातून गोंड समाजाच्या निसर्गस्नेही जीवनशैलीचा वेध घेतला जाणार आहे. निसर्गाशी तादात्म्य साधणारी त्यांची सांस्कृतिक रचना, विधी, गीते आणि मौखिक परंपरा यांचे सखोल दर्शन या सत्रात घडेल. या परिसंवादात आदिवासी कलेच्या अभ्यासक व वास्तुविशारद पद्मजा श्रीवास्तव, क्रिएटिव्ह डिझायनर कोमल बेदी सोहल, सुप्रसिद्ध गोंड कलाकार मयांक सिंग श्याम सहभागी होणार असून डॉ. शिवांगी पारेख संवादाचे सूत्रसंचालन करतील.
बिबट्या आणि माणसांचे सहजीवन माहितीपटातून उलगडणारी कहाणी
सकाळी ११.३० वाजता समीक्षकांनी गौरवलेल्या ‘बियाँड दि कॉन्फ्लिक्ट’ या माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रात राहणाऱ्या बिबट्यांचे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या माणसांचे गुंफलेले जीवन या माहितीपटातून प्रभावीपणे उलगडते. यानंतर माहितीपटाचे निर्माते अथर्व राऊत आणि रिलायन्स फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक डॉ. वरद गिरी यांच्याशी चर्चा होईल.विद्यार्थ्यांसाठी दोन खास कार्यशाळा या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन सहभागात्मक कार्यशाळा.
‘नेस्ट वॉचर्स’ – पक्ष्यांच्या घरट्यांची रचना व निरीक्षण स्पर्धा
सकाळी ११.३० वाजता, इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘नेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे राकेश खत्री यांच्या प्रेरणेतून आणि डॉ. निनाद मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होईल. पक्ष्यांचे वर्तन, घरट्यांचे प्रकार, नैसर्गिक साहित्याचा वापर, निरीक्षण आणि डेटा संकलन यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव, वैज्ञानिक कुतूहल आणि सृजनशीलता वाढवण्याचा उद्देश आहे.
‘एरो ट्रॅकर्स’ – हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण दुपारी २ वाजता, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यावर आधारित ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या सत्रात डॉ. निलेश वाघ आणि डॉ. आयेशा हकीम हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप, डेटा संकलन, संशोधन प्रश्नांची मांडणी आणि विश्लेषण कौशल्य यांचे प्रशिक्षण देतील.
‘सोमैया शाश्वतता संवाद’ हा केवळ परिसंवाद नसून विज्ञान, सामाजिक शास्त्रे, पारंपरिक ज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि संस्कृती यांचा आंतरशाखीय संवाद साधणारा उपक्रम आहे. पर्यावरणीय समस्यांकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोनअजून विद्यार्थ्यांना येथे अनुभवता येतील.हा उपक्रमातील सहभागासाठी cascade.reach@.edu ९३५९५९७८५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
