मुंबई : राज्यातील काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत, तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तेथे उन्हाचा ताप वाढला आहे. मोसमी पाऊस राज्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असले तरी काही भागात अजूनही तापमान चाळीशापार नोंदले जात आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असेही हवामान विभागाने सांगितले.
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून राज्यात उघडीप दिली आहे. कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी अधूनमधून बरसत आहेत. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. गेले तीन ते चार दिवस तेथील तापमान चाळीशीपार नोंदले जात आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. तेथे ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याचबरोबर अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यावतमाळ येथेदेखील पारा चाळीशीपार होता. मागील काही दिवसांपासून या ठराविक भागात तापमानाची सर्वाधिक नोंद होत आहे. राजस्थान, जोधपूर या काही भागात सध्या उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती आहे. तेथे वाहणारे वारे हे मोठ्या प्रमाणात उष्णता वाहून आणत आहेत. त्याचबरोबर विदर्भ तसेच मराठवाड्यात आर्द्रता तसेच ढगांची निर्मिती होत असल्यामुळे या भागात तापमानवाढ झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
पाऊस शुक्रवारनंतर राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील. तसेच उर्वरीत भागातही पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी वारे थिजवलेलेच
नैऋत्य मासमी वाऱ्यांची वाटचाल दोन आठवड्यांपासून एकाच जागी स्थिरावलेली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत मोसमी वारे दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी प्रगती केलेली नाही. मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागात २६ मेपर्यंत मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावलेली आहे.
तापमान नोंदी
अकोला- ४२ अंश सेल्सिअस
अमरावती- ४२.४ अंश सेल्सिअस
ब्रम्हपुरी- ४३.६ अंश सेल्सिअस
गोंदिया- ४०.८ अंश सेल्सिअस
नागपुर- ४३.६ अंश सेल्सिअस
वर्धा- ४२ अंश सेल्सिअस
यवतमाळ- ४१.४ अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजीनगर- ३६.८ अंश सेल्सिअस